Spruha Joshi : मराठी मालिका, नाटक, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच स्पृहा जोशी. स्पृहा उत्तम कवयित्री म्हणून देखील ओळखली जाते. भाषेवर प्रेम करणारी आणि कवितांना मुख्य प्रवाहात आणणारी कवयित्री ही अभिनेत्री स्पृहाची दुसरी ओळख. गोकुळाष्टमी निमित्त सुंदर कविता शेअर करत स्पृहाने पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकून घेतलं आहे.
‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा मालिकांमधून काम करत स्पृहा घराघरांत पोहोचली. तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. यादरम्यान, अभिनेत्री म्हणून कौतुक होत असतानाच कवयित्री म्हणूनही सर्वजण तिचं कौतुक करू लागले. विविध मुलाखतींमधून, कार्यक्रमांमधून स्पृहाच्या कविता चाहत्यांना ऐकायला मिळायच्या. तिच्या युट्यूब चॅनेलवर सुद्धा चाहत्यांना अनेक कविता ऐकायला मिळाल्या.
अभिनेत्री स्पृहा जोशीची गोकुळाष्टमीनिमित्त सुंदर कविता
दर गोकुळाष्टमीला तू बरोबर पाऊस घेऊन कसा येतोस ?
की पाऊस होऊन येतोस ?
सगळं विज्ञान, भूगोल लॉजिक आहेच.
पण आजच्या दिवशी तुला त्यात बांधावसं नाही वाटत !
उगाचच आज तुझ्याशी भांडावंसं नाही वाटत !
तसंही बांधाल तितकं बंधन तोडून लांब जाण्याचंच खूळ तुला…मग तुझे नको ते लाड पुरवण्याची बुद्धी कशाला देतोयस
आमच्या इंटेलेक्चुअल बुद्धीला?
त्यापेक्षा तुझं विश्वरूप दर्शन..
ते पेरलं असतंस आमच्या डोळ्यात…तुझा सारासार विचार टोचला असतास आमच्या बुद्धीला…
आपल्या माणसांना काठावर ठेवण्याची शक्ती दिली असतीस..
किमान तुझी गूढ निळाईची एखाद रंगछटा दिली असतीस…असो जिथे आहेस तिथे खुशाल अस!
इथली फार काळजी करू नको..
दर गोकुळाष्टमीला असा पाऊस पाठवत राहा
फक्त बाकी आमचं काही फार मनावर घेऊ नको..
-स्पृहा
दरम्यान, स्पृहा जोशीच्या या खास पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर स्पृहा कॉलेजमध्ये होती तेव्हा तिने तिचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला. ‘चांदणचुरा’ असं या तिच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहाचं नाव होतं. सध्या अभिनेत्री ‘पुरुष’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.