Ajinkya Raut’s Emotional Post: ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊत हा लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ या सिनेमातून अभिनेता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
अजिंक्य राऊतसह या चित्रपटात निखिल राऊत, तेजस बर्वे, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हे कलाकारसुद्धा झळकणार आहेत. हा चित्रपट ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून, अजिंक्य राऊतने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
“माझ्या आजीच्या अस्थींचं विसर्जन…”
अजिंक्य राऊतने त्याच्या आजीसह काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते दोघेही खळखळून हसताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना अजिंक्यने लिहिले, “आईच्या आठवणींनी सतत डोळ्यात पाणी येतंय, ज्या देहूमध्ये माझ्या आजीच्या अस्थींचं विसर्जन केलं होतं, त्याच देहू गावात आज माझ्या फिल्मचा ‘अभंग तुकाराम’चा पहिला कार्यक्रम आहे. खूप भावनिक क्षण आहे हा. खूप आठवण येत आहे.”
पुढे त्याने लिहिले, “आजी आणि माझं नातं – शब्दांच्या पलीकडचं.” अजिंक्य राऊतच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स केल्याचे दिसत आहे. “आजी तुमच्याबरोबर कायम आहेत. आजी म्हणजे नातवाचं पूर्ण जग”, “त्या कायम तुमच्याबरोबर आहेत”, “किती गोड”, “आजी आठवणींच्या रूपात कायम तुमच्याबरोबर आहेत आणि त्यांचा आशीर्वादही तुमच्याबरोबर आहे.”


“आईला अभिमान वाटावा, अशीच तुझी वाटचाल सुरू आहे, तिचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असतील”, “अजिंक्य तुझ्या आजीचे आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहेत. आजीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा आयुष्यभरासाठी आठवणींचा खजिना आहे. आजीची माया, तिचं प्रेम, आजीनं मायेनं कुशीत घेऊन गालावर हात फिरवून केलेलं प्रेम आणि तिचं हसू हेच खर आयुष्याचं बळ आहे. हा क्षण खूप मौल्यवान आणि तितकाच भावनिक आहे”, अशा अनेकविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.
अजिंक्य सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. फोटो, व्हिडीओ, तसेच त्याच्या व्यावसायिक तसेच खासगी आयुष्याबद्दल तो मोकळेपणाने व्यक्त होताना दिसतो. त्याच्या वक्तव्यांची अनेकदा चर्चा होताना दिसते.
दरम्यान, अजिंक्य राऊतची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.