मराठी कलाविश्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास उपस्थिती लावली होती. यावेळी दिग्दर्शक-गायक अवधूत गुप्ते यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ स्टाईलने उपमुख्यमंत्र्यांची खास मुलाखत घेतली. भर कार्यक्रमात अवधूत गुप्तेंनी अजित पवारांना ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात सुप्रिया सुळे भावुक झालेल्याचा जुना व्हिडीओ दाखवला.
काही दिवसांपूर्वी ‘झी मराठी’वर प्रदर्शित होणाऱ्या अवधूत यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांना अजित पवारांबरोबरचे काही कौटुंबिक फोटो एका व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आले. या व्हिडीओला मेकर्सनी ‘एक हजारों में मेरी बहना है’ हे गाणं जोडलं होतं. हे जुने फोटो पाहून त्या शोमध्ये भावुक झाल्या होत्या. सुप्रिया सुळे भावनिक झाल्याचा हाच व्हिडीओ अवधूत गुप्तेंनी ‘झी चित्र गौरव’च्या पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्र्यांना दाखवला. यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री म्हणाले, “आज माझी राजकीय भूमिका वेगळी आहे. पण, प्रत्येकाची राजकीय भूमिका आणि घरगुती नातेसंबंध वेगळे असतात. तुम्ही पहिल्यापासून आमच्या घरामध्ये पाहिलंत, तर आमचं संपूर्ण घराणं हे शेतकरी कामगार पक्षाचं होतं. त्यावेळी आमचे स्वर्गीय वसंतदादा पवार त्या पक्षाचे लीडर होते आणि त्यांना तिकीट सुद्धा मिळालं होतं. संपूर्ण घर शेतकरी कामगार पक्षाचं काम करत असताना पवार साहेब फक्त काँग्रेसचं काम करत होते. कारण, त्यांना ती विचारधारा पटलेली होती. त्यामुळे आमच्या घरात प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य व राजकीय स्वातंत्र्य आहे.”
हेही वाचा : Video : “काय पाव्हणं आला का…”, ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात सारा अली खानची मराठीत शायरी! व्हिडीओ व्हायरल
“मी इतके वर्ष वडिलधाऱ्यांचा आदर करत आलोय आणि इथून पुढेही करणार आणि तिच महाराष्ट्राची संस्कृती आहे. आम्ही काही वेगळं केलंय अशातला भाग अजिबात नाही. अनेकजण आम्हाला म्हणतात तुम्ही भाजपाबरोबर कसे काय जाऊ शकता? त्यांना एवढंच सांगेन आम्ही कधीकाळी शिवसेनेबरोबर देखील गेलो होतो. पाठीमागच्या आठवणी या वेगवेगळ्या आणि त्या-त्या काळातल्या आहेत. परंतु, आताचा काळ पूर्णपणे बदलला आहे. आता खूप पाणी वाहून गेलंय आणि बरेच जण अलीकडच्या काळात निर्ढावलेले आहेत.” असं मत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंचा भावुक व्हिडीओ पाहून मांडलं.