Amey Wagh on receiving the Best Actor Award: ‘दिल दोस्ती दुनियादारी’सारखी गाजलेली मालिका, हिंदी वेब सीरीज, मराठी चित्रपट, नाटक अशा विविध माध्यमातून, वेगवेगळ्या भूमिकातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारा अभिनेता म्हणून अमेय वाघ ओळखला जातो.

नुकताच तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कार्यक्रमाचे त्याने सूत्रसंचालन केले होते. या शोमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले होते. वेगवेगळे पदार्थ बनवण्याबरोबरच प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे कामही या शोमधील कलाकारांनी केले.

सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाल्यानंतर अमेय वाघने व्यक्त केल्या भावना

आता अभिनेता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे, अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, हा सोहळा जेव्हा पार पडला तेव्हा तो मुंबईत नव्हता, असेही सांगितले.

अमेयने ट्रॉफीबरोबरचे काही फोटो शेअर करत लिहिले, “महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला. या सिनेमाने अप्रतिम आठवणी आणि सोन्यासारखी माणसे तर दिलीच आणि आता पुरस्कारसुद्धा मिळवून दिला.”

“मला चुकून कधी पुरस्कार मिळाला तर मी मुंबईत नसतोच हे माझे दुर्दैव आहे. पण ज्यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला त्या महेश लिमयेसरांनी काल पार्टीसकट ट्रॉफी दिली याचा खूप आनंद आहे. आमच्या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपट द्वितीयसह अनेक पुरस्कार मिळाले. पुनित बालन, पुनित बालन स्टुडिओज हे आमचे खंबीर निर्माते, वैदेही परशुरामी ही आमची लाडकी ज्युली,तसेच सुपरहिट लेखक गणेश पंडित आणि अंबर हडप यांचे मनापासून आभार आणि आमच्या संपूर्ण टीमला घट्ट मिठी”, असे म्हणत अभिनेत्याने भावना व्यक्त केल्या आहेत.”

अमेयच्या या पोस्टवर आदिनाथ कोठारे, रेश्मा शिंदे, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, अभिज्ञा भावे, निवेदिता सराफ, चैत्राली गुप्ते अशा अनेक लोकप्रिय कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, अमेय वाघने फर्स्टक्लास दाभाडे या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. आता आगामी काळात तो कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.