Amruta Khanvilkar Video On Selfie Filters : आयुष्यातील काही खास क्षण दृश्य स्वरूपात आपल्याबरोबर कायम असावेत म्हणून अनेकजण फोटो काढतात. त्यातच आता सेल्फी काढण्याचं खूळ सर्वत्र वाढलं आहे. फोटो काढण्याऐवजी अनेकजण स्वत:च्याच हातांनी मोबाईलमध्ये सेल्फी फोटो काढतात. या सेल्फी फोटोसाठी तर आता बाजारात अनेक मोबाईलही आले आहेत.

सेल्फी फोटोसाठीचे अनेक मोबाईल अ‍ॅप्सही आहेत. ज्यात सेल्फीसाठीचे विविध फिल्टर्स आहेत. या फिल्टर्समध्ये गोरं दिसण्याचे, कान-जीभ बाहेर येण्याचे, तसंच काही प्राण्यांच्या चेहऱ्यांचेही फिल्टर्स आहेत. हे फिल्टर्स काहींना आवडतात, मात्र काहींना हे फिल्टर्स अजिबातच आवडत नाहीत. हे फिल्टर्स न आवडणारी एक अभिनेत्री आहे, ती म्हणजे अमृता खानविलकर.

सेल्फी फोटोमध्ये विविध प्रकारचे फिल्टर्स वापरण्याबद्दल अमृता खानविलकरने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओमध्ये ती म्हणते, “हा व्हिडीओ त्यांच्यासाठी जे माझ्याबरोबर सेल्फी काढायला येतात. अनेक लोक सेल्फीसाठी विचारतात आणि आपण छान फोटो काढतो; ते मला खूप आवडतं.”

यानंतर ती म्हणते, “मला तुमच्याविषयी खूप प्रेम आहे. पण जे भीषण फिल्टर्स तुम्ही वापरता ना…; ज्यात मी कधी पांढरी पाल दिसते, कधी मला कानच येतात, तर कधी मोठी जीभच येते…त्या फोटोत मला कळतच नाही की, मी माझ्यासारखी का दिसत नाही. साधा फोटो काढा. मला मी जशी आहे, जशी दिसते; तशी खूप आवडते. तुम्हाला आवडत नसेल, तर तो तो तुमचा प्रॉब्लेम आहे.”

यानंतर अमृता म्हणते, “मला माझ्या आईवडिलांनी जन्माला घातलं मी तशीच दिसणार आहे. काय होतं.. या फिल्टर्समुळे संपूर्ण चेहरा पांढरा आणि फक्त जीभ लाल दिसते. त्यात तुमची अपेक्षा असते की, ते फोटो रिपोस्ट करावेत? हे असे फोटो मी रिपोस्ट करत नसते.”

अमृता खानविलकर इन्स्टाग्राम स्टोरी व्हिडीओ

अमृता खानविलकर इन्स्टाग्राम स्टोरी व्हिडीओ

दरम्यान, अमृता ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश फोटो-व्हिडीओ शेअर करत असते. तसंच ती तिच्या सोशल मीडियाद्वारे तिच्या दैनंदीन आयुष्यातील काही खास प्रसंगे, आठवणी व अनुभवही शेअर करत असते. अशातच तिने हा फिल्टर्सचा व्हिडीओ शेअर केला आहे.