Amruta Khanvilkar : त्र्यंबकेश्वर देवस्थान हे नाशिकजवळील एक महत्त्वाचं धार्मिक ठिकाण असून भगवान शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वर हे ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलं आहे. वर्षाचे बाराही महिने आणि विशेषत: श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. सामान्य लोकांप्रमाणे अनेक सेलिब्रिटी सुद्धा या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.

काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या ज्योतिर्लिंग यात्रेची सुरुवात त्र्यंबकेश्वर मंदिरात पत्नीसह दर्शन घेऊन केली होती. प्रसाद आणि मंजिरी ओक यांच्या पाठोपाठ आता लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर देखील त्र्यंबकेश्वरला पोहोचली आहे. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अमृताने या व्हिडीओला ‘हर हर महादेव!’ असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीने आपल्या कुटुंबीयांसह त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अमृता तिचा भाचा निर्वाण आणि भाची नुरवी यांच्यासह नाशिकला गेली होती. त्यांच्याबरोबरचे गोड फोटो शेअर करत अमृताने मावशीबरोबरची पहिली ट्रिप असं कॅप्शन या फोटोंना दिलं आहे. यावेळी अभिनेत्रीने सुंदर प्रिटेंड साडी नेसल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय मंदिरात दर्शन घेताना तिची आई देखील उपस्थित होती.

अमृता आणि निर्वाण-नुरवीमध्ये खूपच सुंदर बॉण्डिंग आहे. बहिणीची मुलं असली तरी अमृता आईप्रमाणे नेहमी त्यांची काळजी घेताना दिसते. यावेळी लाडक्या निर्वाणचा हात धरून अमृता त्याला मंदिराच्या परिसरातील विविध गोष्टी दाखवत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अमृता म्हणते, “पहिल्यांदाच निर्वान आणि नुरवी मावशीबरोबर फिरायला आले आणि ही साडी मंजिरी ओकने दिलीये.”

Amruta Khanvilkar
Amruta Khanvilkar

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “हर हर महादेव”, “किती सुंदर व्हिडीओ आहे”, “तुम्ही तिघंही किती गोड आहात”, अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, अमृताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर नुकताच तिला ‘चंद्रमुखी’ सिनेमासाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तिच्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी परदेश दौऱ्यावर गेली होती. आता अमृता नव्या कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.