हिवाळा सुरू झाल्यावर दरवर्षी लाखो पर्यटक वाराणसीला जातात. या शहराला बनारस, काशी असंही म्हटलं जातं. गेल्या महिन्याभरात अनेक सेलिब्रिटींनी वारणसीला भेट दिल्याचं पाहायला मिळालं. यंदा देवदिवाळी साजरी करण्यासाठी ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्री दिशा परदेशी बनारसला गेली होती. आता तिच्या पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर वाराणसीला पोहोचली आहे.

अमृता खानविलकरने तिच्या वाराणसी ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बनारसला गेल्यावर तेथील रामघाट, नमोघाट, दशाश्वमेध, अस्सी, केदारेश्वर घाट अशा विविध ठिकाणांना भेट देणं हे पर्यटकांचं मुख्य आकर्षण असतं. याशिवाय बनारसमध्ये ‘श्री काशी विश्वनाथ मंदिर’ आहे. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर गेल्या काही महिन्यांपासून तिची १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण करत असल्याचं पाहायला मिळतंय. यंदाच्या वर्षी केदारनाथ, त्र्यंबकेश्वर, उज्जैन महाकाल या मंदिरांना अभिनेत्रीने भेट दिलेली आहे. आता अभिनेत्री काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी वाराणसीला पोहोचली आहे.

अमृताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गंगा आरतीची झलक पाहायला मिळतेय. वाराणसीला गंगाकिनारी जाऊन प्रत्यक्ष गंगा आरती पाहायची अशी अनेकांची इच्छा असते. अमृता गंगा आरती अनुभवण्यासाठी नमोघाट परिसरात गेली होती. अभिनेत्रीने बनारसच्या गंगा आरतीची खास झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

दरम्यान, अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिला मराठी कलाविश्वाची ‘चंद्रमुखी’ म्हणून ओळखलं जातं. आजवर अभिनेत्रीने अनेक मराठी सिनेमांसह बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘द ताज स्टोरी’ सिनेमात अमृता महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती.