Amruta Khanvilkar Wins First State Film Award : आयुष्यात ज्या गोष्टी पहिल्यांदा घडतात त्याचं आपल्याला विशेष महत्त्व असतं लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरच्या आयुष्यात सुद्धा असंच काहीसं घडलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या ६० आणि ६१ व्या ‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात अमृताला ‘चंद्रमुखी’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा तिचा पहिला राज्य पुरस्कार होता. सध्या अमृता ‘सुंदरी-अदा ताल श्रृंगार’ या कार्यक्रमानिमित्त विदेश दौऱ्यावर आहे. त्यामुळे ‘चंद्रमुखी’ सिनेमाचा दिग्दर्शक प्रसाद ओकने अमृताच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
‘चंद्रमुखी’साठी राज्य पुरस्कार जाहीर होताच अमृताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. प्रसाद व मंजिरी ओक, ‘चंद्रमुखी’मधील तिचे सहकलाकार आदिनाथ कोठारे- मृण्मयी देशपांडे आणि संपूर्ण चंद्रमुखी टीमचे अमृताने आभार मानले आहेत.
यंदाचा ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा’ दिग्गज कलाकार आणि नेते मंडळीच्या उपस्थितीत अगदी थाटात पार पडला. अमृता सध्या भारतात नसली तरी अगदी सातासमुद्रापार राहून तिने आपला उत्साह आणि आनंद चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. अभिनेत्री म्हणते, “महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार जिंकणं ही माझ्यासाठी खरोखरच खूप सन्मानाची गोष्ट आहे. ‘चंद्रमुखी’साठी आम्ही सगळ्यांनी एक टीम म्हणून काम केलं होतं. अगदी दिग्दर्शकापासून ते स्पॉट बॉयपर्यंत प्रत्येकाने घेतलेली मेहनत आज सार्थकी लागली आहे. या सिनेमाला राज्यभरात खूप प्रेम मिळालं, प्रेक्षकांचं प्रेम आजही दिसून येतंय. “
अमृता पुढे म्हणते, “महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित होणं हा क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही अर्थातच हा माझा पहिला राज्य पुरस्कार आहे. यातून मी फक्त ऊर्जा आणि नवनवीन दर्जेदार काम करत राहायचं अशी प्रेरणा घेतली आहे. चांगल्या लोकांबरोबर काम करायचं आणि आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची हेच ध्येय आहे. यानिमित्ताने संपूर्ण ज्युरी टीमचे, ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ टीमचे खूप खूप आभार त्यांनी हा क्षण माझ्या आयुष्यात आणला, माझ्या कामाचं कौतुक करून हा खास पुरस्कार मला दिला याबद्दल मी कायम ऋणी असेन. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद”
“हा पुरस्कार मिळाला, हे अजूनही खरं वाटत नाहीये… पण आज महाराष्ट्र शासनाने, माझ्या राज्याने, मला असा मान दिला याचा मनापासून अभिमान वाटतोय.” अशा भावना अमृताने व्यक्त केल्या आहेत.