अशी ही बनवाबनवी हा चित्रपट पाहिला नाही असा मराठी माणूस सापडणार नाही. २३ सप्टेंबर १९८८ ला चित्रपट प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाने इतिहास घडवला. आज ३७ वर्षे उलटूनही चित्रपटाची गोडी आणि त्यातल्या कोपरखळ्या, विनोद हे सगळं हवंसंच वाटतं. अबालवृद्धांना आजही या चित्रपटाची भुरळ पडते ती याच कारणाने.
धनंजय माने ही चित्रपटाची खासियत
धनंजय माने हे चित्रपटाचं मध्यवर्ती पात्र. ही भूमिका अशोक सराफ यांनी केली आहे. अशोक सराफ यांची ही भूमिका इतकी गाजली की अनेक लोक त्यांना धनंजय माने म्हणूनच ओळखतात. लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत रे आणि सचिन या चौघांची भट्टी चित्रपटात उत्तम जमून आली आहे. शिवाय सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता जोशी, अश्विनी भावे, प्रिया अरुण यांची कामंही चांगली झाली आहेत. सुधीर जोशी, नयनतारा, विजू खोटे आणि गुलाब कोरगावकर यांच्याही भूमिका लक्षवेधी झाल्या आहेत. या चित्रपटाची कथा आणि पटकथा वसंत सबनीस यांनी लिहिली आहे. निखळ विनोद कसा असतो ते सबनीसांनी त्यांच्या लेखणीतून दाखवून दिलं आहे. त्याची साक्ष क्षणाक्षणाला पटतेच. या सिनेमाची सर्वात मोठी खासियत म्हणजे हा चित्रपट कुठूनही पाहिला तरी कंटाळा येत नाही.
अनेक भाषांमध्ये झाला बनवाबनवी
मराठीत या चित्रपटाने अफाट यश मिळवलं आणि तुफान प्रेम तर मिळवलंच. पण १९९१ मध्ये हा चित्रपट तेलगु भाषेत चित्रम भल्लारे विचित्रम या नावाने करण्यात आला. त्यानंतर २००३ मध्ये ओलू सार बारी ओलू या नावाने करण्यात आला. २०१४ मध्ये पंजाबी भाषेत मिस्टर अँड मिसेस ४२० या नावाने करण्यात आला. तर २०१७ मध्ये बंगाली भाषेत जिओ पगा अशा नावाने पुनर्निमित झाला.
चित्रपटातले संवाद ही चित्रपटाची सर्वात जमेची बाजू
बनवाबनवीतला विनोद हा अत्यंत साधा सरळ आणि ओठांवर हसू फुलवणारा आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चित्रपटातले संवाद. आय लव्ह यू, सेंटचं नाव आहे सेंटचं नाव आहे. हा माझा बायको पार्वती, सत्तर रुपये वारले, अरे हा धनंजय कमवता आहे ना, कमावता असला तरी आता गमावता आहे सगळा पगार मी केव्हाच गमावला. जाऊ बाई, नका बाई इतक्यात जाऊ हे आणि असे अनेक संवाद आजही मराठी रसिकांना तोंडपाठ आहेत. शिवाय या चित्रपटाची आणखी एक जादू म्हणजे चित्रपटातली गाणी.

चित्रपटातली गाणीही उत्तम
मनुजा जाग जरा, अशी ही बनवाबनवी, कुणी तरी येणार गं, हृदयी वसंत फुलताना अशी सगळीच गाणी रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. शिवाय धनंजय मानेला बालगंधर्वांचा फोटो पाहून परशा आणि सुधीरला बाई बनवता येईल ही सुचलेली कल्पना तर भन्नाटच होती. निखळ मनोरंजनाचं उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे यात शंकाच नाही.
चित्रपटातले तीनच संवाद उत्स्फुर्तपणे आलेले
“अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातले तीन डायलॉग सेटवर बोलले गेले असतील. बाकी सगळे डायलॉग स्क्रिप्टमध्ये लिहिले होते. वसंत सबनीस आणि मी एकत्र बसून ती स्क्रिप्ट लिहिली होती. “धनंजय माने इथेच राहतात का?”, हा डायलॉग स्क्रीप्टमध्ये लिहिलेला होता. मी वसंत सबनीसांना तो संपूर्ण प्रसंग करुन दाखवला की हे असं छान दिसेल. त्यावर ते म्हणाले की प्रेक्षक हसतील का? मी हो म्हटलं. ती सगळी सिच्युएशन ठरवून केलेली आहे असं सचिन पिळगावकर यांनी म्हटलं आहे. तसंच “हा माझा बायको पार्वती” हा अशोक सराफ यांचा डायलॉग, “सारखं सारखं काय त्याच झाडावर” हा लक्ष्याच्या तोंडी असलेला डायलॉग मला सुचला होता, तो मी त्याला घ्यायला सांगितला आणि “जाऊबाई, नका बाई इतक्यात जाऊ…” हा लक्ष्याचा डायलॉग तिथे आपसूकच म्हटले गेले होते. बाकी सगळे डायलॉग स्क्रीप्टमध्ये आधीपासूनच लिहिलेले होते.”, असं एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी सांगितलं होतं. त्यामुळे हा चित्रपट बघायला जितकी मजा येते तेवढीच तिथे सेटवरही होत असणार याची प्रचिती येतेच.

धनंजय मानेची भूमिका मिळाली हा चमत्कारच-अशोक सराफ
धनंजय मानेची भूमिका मला मिळाली हा काहीतरी चमत्कारच आहे असं मला वाटतं. या सगळ्याचं क्रेडिट मी देतो ते वसंत सबनीस यांना त्यांनी उत्तम प्रकारे तो रोल लिहिला. कारण चित्रपटात जे काही करतो ते धनंजय माने करतो आणि त्या शिवाय तीन नगांना सांभाळतो. दोघांना बायका बनवलं आहे. त्यामुळे धनंजय माने हैराण आहे. शिवाय तो अशा प्रकारे लिहिला आहे की लोकांना तो आजही स्मरणात आहे. वसंत सबनीस यांनी उत्तम पटकथा लिहिली होती त्यामुळे तो चित्रपट करताना मजा आली. अशी आठवण अशोक सराफ यांनी लोकसत्ताच्याच मुलाखतीत सांगितली होती.
अशी ही बनवाबनवी हा चित्रपट ३७ वर्षांचा झालाय. मात्र त्याचा गोडवा तसूभरही कमी झालेला नाही. सदैव हवी हवीशी वाटणारी ही बनवाबनवी आहे. ज्या चित्रपटाचं गारुड आजवर कैक पिढ्यांनी अनुभवलं आहे. पुढच्या अनेक पिढ्या अनुभवत राहतील यात शंका नाही.