अभिनेते अशोक समर्थ यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, पहिल्यांदा ते प्रसिद्धीझोतात आले ते ‘सिंघम’ या चित्रपटामुळे. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारत त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच आता अशोक समर्थ यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीसह हजेरी लावली होती.
अशोक समर्थ यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांनी व त्यांच्या पत्नीने त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं आहे. त्यांनी लव्हस्टोरी सांगत असताना त्यांच्या लग्नात घडलेला एक किस्साही सांगितला आहे. अशोक म्हणाले, “हळदीची वेळ होती ६ वाजताची; पण वऱ्हाड पोहोचलं रात्री १२ वाजता.” याला दुजोरा देत त्यांची पत्नी अभिनेत्री शीतल फाटकने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शीतल म्हणाली, “आम्ही वाईमध्ये लग्न केलं होतं. तेव्हा मी व माझी बहीण आम्ही गाडीने पुढे आलो होतो. आणि माझ्या घरचे इतर सर्वांसह एका बसमधून येत होते. पण, अर्ध्या रस्त्यात त्यांची गाडी बंद पडली आणि गाडीचालकानं १० मिनिटात गाडी सुरू होईल, असं म्हणत खूप वेळ घेतला. त्यामुळे त्यांना पोहोचायला उशीर झाला.” पुढे या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे.
लव्हस्टोरी सांगताना शीतल म्हणाली, “आम्ही पहिल्यांदा ‘ट्रॅफिक जाम’ चित्रपटाच्या निमित्ताने भेटलो होतो. त्यानंतर आम्ही काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. यादरम्यान आमच्यामध्ये मैत्री निर्माण झाली आणि पुढची बरीच वर्ष आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. पण, काही दिवसांनी माझ्या घरून, ‘आता लग्नाचं वय झालं आहे. लग्न कर’, असं सांगण्यात आलं तेव्हा आम्ही एकमेकांसह या सर्व गोष्टींबद्दल बोलायचो. तेव्हा आपण एकमेकांचे इतके चांगले मित्र आहोत. मग आपण एकमेकांसह लग्न करूयात, असं ठरवलं आणि आम्ही वाई येथे २१ फेब्रुवारी २०१९ रोजी लग्न केलं होतं.”
दरम्यान, अशोक समर्थ यांनी आजवर ‘सिंघम’, आर. राजकुमार’, ‘विट्टी दांडू’, ‘रावरंभा’, ‘पागलपंती, ‘एक चालीस की लास्ट लोकल’, ‘रावडी राठोड’ यांसारख्या अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. तर शीतल फाटकने ‘बाई गो बाई’, ‘गाव माझा तंटामुक्त’ व ‘मंडळी तुमच्यासाठी कायपण’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.