Ashok Saraf Padma Shri Award : महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. आजवर त्यांनी जवळपास २५० हून अधिक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. हा खास क्षण व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत अशोक सराफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अशोक सराफ म्हणाले, “पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार मानतो. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम असेच राहू द्या”
या सोहळ्याला अशोक सराफ यांचं कौतुक करण्यासाठी त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ व अन्य कुटुंबीय देखील उपस्थित होते. सध्या मराठी कलाविश्वातून अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
सुप्रिया पिळगांवकर, सलील कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, सायली संजीव या कलाकारांनी खास पोस्ट शेअर करत अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
यंदा पद्म पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली होती. या यादीत अशोक सराफ यांच्यासह महाराष्ट्रातील इतरही महत्त्वाची नावं आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी ( २७ मे २०२५ ) नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री अमित शहा, एस. जयशंकर, प्रल्हाद जोशी, जितेंद्र सिंह, जी. किशन रेड्डी आणि इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
दरम्यान, अशोक सराफ यांनी विनोदाचं अचूक टायमिंग साधत गेली वर्षानुवर्षे त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या मराठी कलाविश्वातून अभिनेत्यांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.