विनोदाचं अचूक टायमिंग साधत गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मश्री अशोक सराफ यांनी नुकताच त्यांचा ७८ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. याशिवाय अशोक सराफ यांचे कुटुंबीय, कलाविश्वातील जवळचे मित्रमंडळी, त्यांच्या पत्नी निवेदिता यांनी देखील खास पोस्ट शेअर करत अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.

अशोक व निवेदिता यांचा मुलगा अनिकेत सराफ परदेशात असतो. त्याने देखील वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करून ‘बाबांचा खूप अभिमान वाटतोय’ असं म्हटलं आहे. तसेच पद्मश्री सोहळ्याला तो उपस्थित नव्हता त्यामुळे हा संपूर्ण सोहळा अनिकेतने लाइव्ह पाहिला असंही त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

अनिकेत सराफ लिहितो, “मला आजही आठवतंय… माझ्या वडिलांना महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च सन्मान म्हणजेच महाराष्ट्रभूषण पुरस्कार साधारण वर्षभरापूर्वी प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी मी प्रचंड आनंदी झालो होतो, मला त्यांचा खूप अभिमान वाटत होता. तो भव्य क्षण कोणीच शब्दांत व्यक्त करू शकणार नाही असाच होता आणि आता पुन्हा एकदा बाबांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. आज मी त्यांच्यापासून हजारो मैल दूर आहे पण, लाइव्ह ब्रॉडकास्टवर संपूर्ण पद्मश्री सोहळा पाहताना मन भरुन आलं. त्यांना पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना पाहून खरंच खूप अभिमान वाटला. म्हणूनच या खास दिवशी मी माझ्या वडिलांना खूप-खूप शुभेच्छा देत आहे. त्यांच्या कामाचं, अभिनयाचं कौतुक सगळेच करतात मात्र, आज मी अशोक सराफांमधले प्रेमळ वडील अन् त्यांच्या माणुसकीचं विशेष कौतुक करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…तुम्हाला खूप-खूप प्रेम आणि शुभेच्छा!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतने करिअर करण्यासाठी अभिनय क्षेत्रापेक्षा एक वेगळी वाट निवडली. अनिकेत हा शेफ आहे. आई निवेदिता यांच्यामुळे त्याला लहानपणापासून स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. अनिकेतने त्याचं शिक्षण फ्रान्समध्ये पूर्ण केलं आहे. तो भारतीय तसेच पाश्चिमात्त्य पदार्थ सुद्धा बनवतो. निक सराफ या नावाने तो सोशल मीडियावर सक्रिय आहे.