Ashutosh Gowariker : ‘लगान’, ‘स्वदेश’, ‘जोधा अकबर’, ‘पानिपत’ अशा अनेक नामांकीत चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक म्हणजे आशुतोष गोवारीकर. आशुतोष गोवारीकर हे निर्मिती आणि दिग्दर्शनातील एक मोठे नाव आहे. मागील अनेक वर्षांपासून भारतीय चित्रपटांचं जगभरात उल्लेखनीय नाव होण्यात गोवारीकरांचा मोठा सहभाग आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती प्रक्रियेने भारतीय चित्रपटसृष्टीत मागील तीन दशकांपासून आशुतोष गोवारीकरांनी मोठं योगदान दिलं आहे.

आशुतोष गोवारीकरांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक कलाकृतींचे प्रेक्षकांकडून आजही कौतुक होताना दिसते. शिवाय त्यांच्या अभिनयाचेही अनेक चाहते आहेत. काही वर्षांपुर्वी त्यांनी प्रियंका चोप्राच्या ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर ते ‘काला पानी’ आणि ‘मानवत मर्डर’सारख्या सीरिजमधून अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यानंतर आता आशुतोष गोवारीकर हे ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.

‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवराज वायचळने केलं असून त्याचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात आशुतोष गोवारीकर प्रथमच शिवराजच्या दिग्दर्शनाखाली अभिनेता म्हणून काम करत आहेत. शिवराजबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल आशुतोष गोवारीकरांनी सांगितलं आहे. अल्ट्रा मराठी बझला दिलेल्या मुलाखतीत आशुतोष गोवारीकरांनी “दिग्दर्शकाचा आत्मविश्वास पाहून आम्हाला उत्साह वाटायचा” असं म्हटलं.

याबद्दल आशुतोष गोवारीकर असं असं म्हणाले की, “मला वाटतं अनुभवी दिग्दर्शक असो किंवा आता नव्याने पदार्पण करणारा दिग्दर्शक असो. तो अभ्यास किती करतो? हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मला वाटतं शिवराज वायचळने या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे. शिवाय या चित्रपटाची पटकथा त्याची आहे. ओंकार गोखले आणि अरविंद जगताप यांनीही त्याला साथ दिली आहे. यामागे त्याचा खूप अभ्यास आहे. त्यामुळे सेटवर येताना त्याचा आत्मविश्वास खूप वेगळ्या स्वरूपाचा होता.”

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “शिवराजला नेमकं माहिती होतं की, त्याला नक्की काय करायचं आहे? आणि त्याचा आत्मविश्वास बघून आम्हाला कलाकार म्हणूनही एक वेगळाच विश्वास यायचा. आम्हाला माहिती होतं हा आम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि मार्गदर्शन करणारा जो आहे तो खूप आत्मविश्वासू आहे. त्याला माहीत आहे तो नक्की काय करतोय. त्यामुळे तो जी आज्ञा देईल त्याचं आपल्याला पालन करायचं आहे. ही प्रक्रिया खूप चांगली होती. आम्ही ते खुप एन्जॉय केलं.”

दरम्यान, ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटात आशुतोष गोवारीकर यांच्यासह भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीणकुमार डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, श्रीकांत यादव आणि रोहिणी हट्टंगडी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘आता थांबायचं नाय’च्या निमित्ताने शिवराज वायचळने चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.