Ashwini Bhave Instagram Video : हिंदीसह मराठी सिनेसृष्टीतला ग्लॅमरस चेहरा म्हणजे अभिनेत्री अश्विनी भावे. ‘अशीही बनवाबनवी’सह अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. मराठीच नव्हे तर, हिंदी आणि कन्नड मनोरंजन विश्वातही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. सध्या त्या मनोरंजन विश्वात फारशा सक्रीय नाहीत; मात्र त्या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात
अश्विनी भावे यांनी किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केले आणि त्यानंतर अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यांच्या मुलांचे बालपण, शिक्षणही अमेरिकेतच गेलं. अमेरिकेमध्ये राहूनही त्यांची भारताशी असलेली नाळ काही तुटलेली नाही. अमेरिकेतून त्या सोशल मीडियवर आपले फोटो-व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
अश्विनी भावे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या अमेरिकेमधील घरी मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी भेट दिल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. मराठी इंडस्ट्रीमधील आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटून त्यांनाही आनंद झाला आणि या आनंदाने त्या अगदी भारावून गेल्या. या खास क्षणांचा व्हिडीओ अश्विनी भावे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला असून हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
नुकताच NAFA म्हणजेच नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनचा ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव’ पार पडला. या ‘नाफा महोत्सवा’ला मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, अवधूत गुप्ते, वैदेही परशुरामी, स्वप्नील जोशी आणि गजेंद्र अहिरे हे कलाकार उपस्थित होते.
या महोत्सवानंतर सर्वच कलाकारांनी अश्विनी भावे यांच्या घरी भेट दिली. या भेटीचे खास क्षण अश्विनी भावे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओद्वारे शेअर केले. या व्हिडीओमध्ये अश्विनी भावे यांनी त्यांच्या घरासमोरील स्वत: केलेल्या शेतीची सफर घडवून आणली. यानंतर त्यांनी सर्वांचं आदरातिथ्यही केलं. पुढे सर्वांनी अवधुत गुप्तेच्या सांगीतिक मैफिलीचासुद्धा आनंद घेतल्याचं या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमधून अश्विनी यांनी त्यांचा आनंदही व्यक्त केला आहे. याबद्दल त्या म्हणतात, “घरी इतके रथी, महारथी आलेत आणि त्यांना बघून खूपच आनंद होत आहे. आम्ही सगळे मिळून खूपच मज्जा करत आहोत.” तर हा व्हिडीओ शेअर करत त्या लिहितात, “आनंद, हास्य आणि प्रेमाने भरलेलं एक घर – आणि त्या सगळ्या क्षणांना टिपण्यासाठी एक कॅमेरा. NAFA नंतरच्या निरोप समारंभाचा खास क्षण.”
दरम्यान, अश्विनी भावेंनी शेअर केलेला हा व्हिडीओ अनेकांच्याच पसंतीस उतरला आहे. तशा प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. “तुम्ही खूप प्रेमळ आहात”, “परदेशात जेव्हा आपल्या मातीची म्हणजे भारतातली माणसे येतात ना तो आनंद वेगळाच असतो”, “मराठी कलाकारांचा किती अगत्याने पाहुणचार करता तुम्ही… खरच खुपच गोड”, पूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच तुमच्या घरी आली आहे” या आणि अशा अनेक प्रतिक्रियांमधून सगळ्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.