मराठी सिनेसृष्टीला लाभलेले एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते भरत जाधव. आजवर त्यांनी मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आज त्यांनी या सिनेसृष्टीत जे नाव कमावलं आहे, त्यामागे त्यांचा खूप मोठा संघर्ष आहे. भरत जाधव यांनी खूप खडतर परिस्थितीतून दिवस काढत आजचं हे यश मिळवलं आहे आणि या यशात त्यांच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. याबद्दल स्वत: भरत जाधव यांनी अनेक मुलाखतींमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भरत जाधव यांचे वडील हे टॅक्सी ड्रायव्हर होते. १९४८ मध्ये ते मुंबईत येऊन स्थायिक झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली. त्यांच्या वडिलांना दिवसाला १०० रुपये मिळायचे आणि वडिलांच्या या टॅक्सीवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. तर त्या काळात भरत जाधव हे नाटक व चित्रपटांमधून इंडस्ट्रीत त्यांचं नाव कमवण्यासाठी धडपडत होते. अखेर थोडं नाव कमावल्यानंतर भरत जाधव त्यांच्या मुलाखतीत स्वत:चा उल्लेख टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा असा करायचे.
भरत जाधव यांनी स्वत:ला टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा म्हणणं ही सहानुभूती नसल्याचे नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे. आरपारला दिलेल्या मुलाखतीत भरत जाधव यांनी सांगितलं की, “मी प्रत्येक मुलाखतीत सांगायचो की, मी टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा आहे. हे सांगण्यामागे माझी वेगळी कारणं होती, सहानुभूती देणारी कारणं नव्हती. मी त्या घरातून आलो आहे, जिथे आमच्या वडिलांनी खूप मेहनत केली आहे आणि आता बरं वाटतं की त्या मेहनतीचं फळ मिळालं आहे.”
यानंतर भरत जाधव वडिलांचा किस्सा सांगत म्हणाले की, “मी एकदा वडिलांना याबद्दल विचारलं होतं की, अण्णा तुम्हाला वाईट तर वाटत नाही ना… मी असं थेट टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा आहे असं म्हणतो त्याबद्दल? त्यावर ते एक वाक्य म्हणाले होते की, असं बोलत जा… कारण माझ्यासारख्याच अजून कुठल्यातरी टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा असेल ना तर त्याला बळ येईल आणि वाटेल की, हा करु शकतो तर मीसुद्धा करु शकतो. त्याच्याही मनात तो आत्मविश्वास निर्माण होईल. त्यामुळे हे सांगायला लाजायचं कशाला?”
वडिलांच्या विधानाबद्दल पुढे भरत जाधव यांनी म्हटलं की, “वडील म्हणायचे, आपण काय चोरी केली आहे का? आपण तर मेहनत केली आहे. टॅक्सी चालवली आहे. त्यात काय गैर नाही. तो पण एक मेहनतीचाच भाग आहे. उद्या त्याच पद्धतीचे वडील किंवा त्याच मेहनतीचा मुलगा काय करत असेल आणि तुझा आदर्श घेत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे बोलत जा असं काही नाही.” यानंतर भरत जाधव म्हणाले की, “मला वडिलांचं ते विधान खूप आवडलं होतं.”
दरम्यान, भरत जाधव यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, नुकताच त्यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच आता त्यांचा आगामी ‘बंजारा’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर शरद पोंक्षे आणि सुनिल बर्वे हे कलाकार आहेत.