‘बॉईज ४’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘बॉईज’, ‘बॉईज २’ आणि ‘बॉईज ३’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘बॉईज ४’ प्रदर्शित होऊन १० दिवस झाले आहेत. या दहा दिवसात चित्रपटाने केलेल्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
‘बॉईज ४’मधील अभिनेता पार्थ भालेरावने पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या कमाईबाबत अपडेट दिली आहे. पार्थने इन्स्टाग्रामवर ‘बॉईज ४’चे पोस्टर शेअर करत बॉक्स ऑफिसच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. २० ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने १० दिवसांत ४.२० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘बॉईज ४’ चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड, अभिनय बेर्डे, निखिल बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीश कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांची प्रमुख भूमिका आहे. विशाल देवरुखकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘बॉईज’, ‘बॉईज २’चे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. कथेबरोबरच या चित्रपटातील गाणीही चांगलीच लोकप्रिय झाली आहेत.