Chhaya Kadam Pandharpur Wari Video : आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना मनाला ओढ लागते ती पंढरीच्या विठुरायाचं सावळे रूप पाहण्याची, त्याला भेटण्याची आणि त्याचं दर्शन घेण्याची. आषाढी वारीनिमित्त अनेक वारकरी मंडळी ‘भेटीचिया ओढ लागलीसी डोळा’ म्हणत पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत असतात. हा सोहळा अवघा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहतो. वारीचा हा अनोखा सोहळा अनुभव अनुभवण्यासाठी असंख्य वारकरी पालखीत सहभागी होत असतात.
सामान्य वारकऱ्यांबरोबरच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही वारीत सहभागी होतात आणि सामान्य वारकऱ्यांसह देहभान हरपून जातात. यंदाच्या पंढरपूरच्या वारीतही काही मराठी कलाकारांनी सहभाग घेतला होता. सायली संजीव, सायली पाटील, आलापिनी, कश्मिरा कुलकर्णी असे अनेक मराठी कलाकार यंदाच्या वारीत सहभागी झाले आहेत.
अशातच अभिनेत्री छाया कदम यादेखील यंदाच्या वारीत सहभागी झाल्या आहेत आणि याची खास झलक त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. छाया कदम सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या विविध लूक्समधील फोटो शेअर करत असतात. अशातच त्यांनी नुकताच शेअर केलेला वारीचा व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
छाया कदम इन्स्टाग्राम व्हिडीओ
छाया कदम यांनी शेअर केलेल्या या वारीच्या व्हिडीओमध्ये त्या वारीतील अश्वांचं दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच त्या रिंगण सोहळ्यातही सहभागी झाल्या होत्या. तर यादरम्यान, त्यांनी हातात बांगड्या भरल्याचीही खास झलकही शेअर केली आहे. या वारी सोहळ्यात त्यांना आणखी एका मराठी अभिनेत्रीची साथ लाभली होती, ती म्हणजे पायल जाधवची. छाया कदम आणि पायल जाधव टा दोघींनी एकत्र पायवारी केली.
केवळ पायवारीच नव्हे तर या वारीच्या सोहळ्यात पायल आणि छाया कदम यांनी एकमेकांबरोबर फुगडीचा खेळही खेळला. शिवाय वारीतील इतर वारकऱ्यांबरोबर काही पारंपरिक खेळही खेळले. हा व्हिडीओ शेअर करत “पहिलीच वारी जणू जन्मास उभारी. विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल… याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा” असं म्हटलं आहे. छाया कदम यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडला आहे.
दरम्यान, छाया कदम यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी मराठी आणि हिंदीसह काही दाक्षिणात्य चित्रपट तसंच काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपटांमधुन आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. त्यांच्या ‘लापता लेडीज’ या हिंदी चित्रपटातील त्यांनी भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं. तर पायल जाधवबद्दल बोलायचं झाल्यास, ती सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.