मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसाद ओकला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसादने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाबरोबरच प्रसादने दिग्दर्शन क्षेत्रातही आपली छाप सोडली आहे. सोशल मीडियावर प्रसाद नेहमी सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान, एका नव्या पोस्टमुळे प्रसाद चांगलाच चर्चेत आला आहे.
या वर्षाच्या मुहूर्तावर प्रसादने नवीन घर खरेदी केले. प्रसादने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. नुकताच प्रसादने आपल्या नवीन घरात गृहप्रवेश केला. या कार्यक्रमाला अभिनेता मंगेश देसाई त्याच्या पत्नीसोबत हजर होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसादच्या नव्या घराच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती.
मंगेश देसाईने एकनाथ शिंदेंच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले, “घराचं स्वप्न आपण सहज बघू शकतो, पण ते पूर्ण होण्यासाठी खूप कष्ट, चिकाटी आणि असंच घर पाहिजे ही महत्वाकांक्षा ठेवली पाहिजे; प्रसाद, तू आणि मंजूने ती ठेवलीस आणि स्वप्न पूर्ण झालं. माझ्या, शलाका आणि साहिलकडून तुझे अभिनंदन. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नेहमीच मेहनत करणाऱ्या आणि कलाकारांच्या पाठिशी असतातच. तुझ्या विनंतीला मान देऊन साहेब घरी आले आणि तुला शुभेच्छा दिल्या. आपल्या सगळ्यांकडून त्यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र!”
दरम्यान, प्रसादच्या कामाबद्दल बोलायचं झाले तर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये प्रसादने काम केले आहे. धर्मवीर चित्रपटातील त्याची भूमिका चांगलीच गाजली होती. या चित्रपटात त्याने शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. याचबरोबर प्रसादचे ‘जिलबी’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘महापरिनिर्वाण’, ‘रीलस्टार’ चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत.