Chief Minister Fadnavis Responds To Kishor Kadam’s Post Regarding His Housing Issue : अभिनेते किशोर कदम यांनी सोमवारी (११ ऑगस्ट) रोजी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्या राहत्या घराला धोका निर्माण झाल्याचं म्हटलेलं. किशोर कदम यांनी सोशल मीडियावर त्यांच्या घरासंबंधित निर्माण झालेल्या अडचणीबाबत पोस्ट करत मुख्यमंत्र्यांना तसेच इतर राजकीय नेत्यांना याची दखल घेण्यास सांगितलेलं. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तक्रारीची दखल घेतली आहे.
किशोर कदम यांनी पोस्टमधून सरकारकडे मदतीचं आवाहनही केलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली असून याबाबत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत किशोर कदम यांना दिलासा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
किशोर कदम यांच्या पोस्टवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत “किशोरजी, आपली ही तक्रार मी सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सांगितली असून, त्यांना यात लक्ष घालण्यास सूचित केले आहे. आपल्याशी ते संपर्कात राहतील,” असं म्हटलं आहे.
किशोर कदम पोस्टमधून काय म्हणालेले?
किशोर कदम यांनी पीएमसी व बिल्डर यांनी संगनमताने कमिटी सभासदांची दिशाभूल करून त्यांच्या सोसायटीतील त्यांचं व इतर काही लोक ज्यांची याला सहमती नाही त्यांची घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण केल्याचं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी सोसायटीतील कमिटी मेम्बर्सनी महत्त्वाची कागदपत्रे, अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून ते राहात असलेली इमारत स्लम डेव्हेलपमेंटखाली डेव्हलप करण्याचे ठरवले असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याचं पोस्टमधून सांगितलं होतं.
कमिटी चौकस नसेल, सोसायटी सभासदांच्या हिताचे पाहात नसेल, PMC आणि बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल तर सामान्य माणसांची राहती घरे एखाद्या ट्रान्झिट कॅम्पसारखी होण्याच्या शक्यता कशा निर्माण होऊ शकतात याचे उदाहरण त्यांची सोसायटी असल्याचं म्हटलं होतं. किशोर कदम यांनी पोस्टमधून त्यांच्या सोसायटीतील वस्तुस्थिती सांगत तसेच काही गोष्टी नमूद करत सरकारकडे मदतीचं आवाहन केलं होतं.