Dashavatar Box Office Collection Day 17 : ‘दशावतार’ हा मराठी सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे. मराठी चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून निर्माते भारावले आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन १७ दिवस झाले आहेत, अजूनही सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. १७ दिवसांत चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. तिसऱ्या रविवारीही चित्रपटाची कमाई कोटींमध्ये आहे. दशावतारचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन किती, ते जाणून घेऊयात.

कोकणातील पार्श्वभूमी असलेला ‘दशावतार’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘दशावतार’ हा कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर आधारित चित्रपट आहे. यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री ही भूमिका केली आहे. टीझर, ट्रेलरनंतर ‘दशावतार’ बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. रिलीजनंतर या चित्रपटाने प्रेक्षकांना सिनेमागृहांमध्ये खेचून आणलं. परिणामी चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल आहेत.

कोकणातील नयनरम्य ठिकाणी सलग ५० दिवस दशावतार या सिनेमाचं शूटिंग झालंय. कोकणातील दशावतार ही परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ या सिनेमात दाखवण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दशावतारला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. प्रेक्षक हा चित्रपट पाहायला सिनेमागृहांमध्ये गर्दी करत आहेत.

दशावतारचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘दशावतार’ने तिसऱ्या रविवारी १ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. शनिवारीही चित्रपटाने १ कोटी रुपयांची कमाई केली होती. दशावतारचे १७ दिवसांचे कलेक्शन २१ कोटी रुपये झाले आहे.

‘दशावतार’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज आहे. तसेच विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर या मराठी कलाकारांची मांदियाळी आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ १२ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला.