Dashavatar Movie : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटात मराठी सिनेविश्वातील दिग्गज कलाकारांची मांदियाळी असून प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी यामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.

१२ सप्टेंबरला प्रदर्शित झाल्यापासून ‘दशावतार’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. शनिवारी ‘दशावतार’च्या कमाईत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिस्त्रीची भूमिका साकारली आहे. त्यांचा दमदार अभिनय, कोकणातील कथानक, चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, कथा अन् बाबुलीच्या आयुष्यातील शेवटचा दशावतार हे कथानक…एकंदर सिनेमाच्या एकूण रचनेने, यातील संवाद आणि गाण्यांनी सध्या प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे.

लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ मेनन यात बाबुलीच्या म्हणजेच दिलीप प्रभावळकरांच्या मुलाची भूमिका साकारत आहेत. प्रत्येक सिनेमाच्या प्रिमियर शोला कलाकारांचे कुटुंबीय व इंडस्ट्रीमधील जवळचे मित्रमंडळी आवर्जून उपस्थित असतात. सिद्धार्थची पत्नी पूर्णिमा सुद्धा आपल्या नवऱ्याचा सिनेमा पाहायला आली होती. यावेळी चित्रपट पाहून थिएटरमधून बाहेर येताच ती प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

सिद्धार्थला मिठी मारून पूर्णिमा प्रचंड रडली. यावेळी अभिनेता तिला धीर देत असल्याचं पाहायला मिळालं. सिद्धार्थचा दमदार अभिनय, त्याने सिनेमात साकारलेलं पात्र याचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे. यामुळेच सिनेमा पाहिल्यावर पूर्णिमा सुद्धा भावुक झाली होती. हा व्हिडीओ मराठी पापाराझीने इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

प्रेक्षकांनी या व्हायरल व्हिडीओवर, “खरंच खूप सुंदर चित्रपट आहे सगळ्यांनीच खूप छान काम केलंय”, “पूर्णिमा का रडतेय याचं कारण सिनेमा पाहून कळेल खरंच खूपच सुंदर सिनेमा आहे”, “आम्ही तुझ्या भावना समजू शकतो” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

दरम्यान, ‘दशावतार’मध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.