Digpal Lanjekar Announces New Movie Abhang Tukaram : दिग्पाल लांजेकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. आजवर दिग्पालने अनेक वैविध्यपूर्ण चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. अशातच आता तो लवकरच एक नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.
दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. हा सिनेमा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित असल्याचं त्याने शेअर केलेल्या पोस्टमधून पाहायला मिळतं. यासह या चित्रपटात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार झळकणार असल्याचं दिसतं.
‘अभंग तुकाराम’ चित्रपटात ‘या’ कलाकारांची वर्णी
‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात अभिनेता अजिंक्य राऊत, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, निखील राऊत, तेजस बर्वे आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णीसुद्धा झळकणार आहेत. यासह या चित्रपटात इतरही काही कलाकार पाहायला मिळणार आहेत.
सोशल मीडियावर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करण्यात आले असून याला “भक्ती, प्रेरणा आणि चैतन्याचा सोहळा! जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा..” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. ‘अभंग तुकाराम’ ७ नोव्हेंबरपासून सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा योगेश सोमण यांनी लिहिली आहे, तर पटकथा स्वत: दिग्पाल लांजेकरने लिहिली आहे.
अभिनेता अजिंक्य राऊतनेही या चित्रपटासंदर्भात पोस्ट शेअर केली असून यामुळे ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेतून झळकणार का याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये असल्याची त्याच्या पोस्टखालील कमेंट्समधून पाहायला मिळत आहे. ‘अभंग तुकाराम’मध्ये अजिंक्यसह विराजस कुलकर्णी व तेजस बर्वेही पाहायल मिळणार आहेत. पोस्टखाली त्यांनाही टॅग करण्यात आलं आहे.
दरम्यान, दिग्पाल लांजेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने आजवर अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटापूर्वीच नुकताच त्याचा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला. यापूर्वी त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अशातच आता त्याने नुकताच त्याच्या ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.