"जात-धर्म पाहून..." नागराज मंजुळेंनी सांगितला पहिल्या प्रेमाचा रंजक किस्सा | director nagraj manjule talk about first love story cast religion and many more nrp 97 | Loksatta

“जात-धर्म पाहून…” नागराज मंजुळेंनी सांगितला पहिल्या प्रेमाचा रंजक किस्सा

“सर्व तरुण जेव्हा पालक होतात तेव्हा ते प्रेमाच्या विरोधात उभे असतात.”

nagraj manjule
नागराज मंजुळे

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. झुंडच्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट येत्या मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच त्यांनी त्यांच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी सांगितल्या.

नागराज मंजुळे यांनी नुकतंच एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी त्यांच्या शाळा्, कॉलेजबद्दलच्या आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांनी त्यांचे पहिले प्रेम आणि प्रेमाच्या बदललेल्या व्याख्यांबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे राष्ट्रवादीत, पक्ष प्रवेशाचं कारण सांगताना म्हणाले “अजित पवार, सुप्रिया सुळे…”

यावेळी ते म्हणाले, “मी कॉलेजपेक्षा शाळेत जास्त मजा केली आहे. आता आपल्याला खूप मोकळीक मिळते. त्यावेळी मुलं एकीकडे आणि मुली एकीकडे असे बसलेले असायचे. त्यावेळी मुलीकडे बघणं हे देखील फार अवघड असायचं आणि त्यात जर ती मुलगी बोलली तर मग अजून तर्क वितर्क सुरु व्हायचे.”

“प्रेम हे फार सुंदर, स्वाभाविक गोष्ट आहे, ते व्हायलाच पाहिजे आणि ते होतेच. एखादाच दगड माणूस म्हणतो की मला अजिबात काहीही वाटलं नाही. सर्व तरुण जेव्हा पालक होतात तेव्हा ते प्रेमाच्या विरोधात उभे असतात. जेव्हा ते तरुण असतात आणि वय वाढलं तर मग ते पण त्यांच्या मुलांच्या विरोधात जातात.

माझं एक प्रकरण वडिलांना कळलं होतं. त्यावेळी माझ्या मोठ्या आत्यामुळे मी वाचलो. त्यावेळी त्यांनी मला खूप मारलं होतं. त्यावरुन माझे आत्याने वडिलांना फार झापलं होतं. त्यावेळी माझे वडील आत्याला त्याने काय केलं तुला माहितीये का? असं विचारत होते. पण तेव्हा आत्याने तू काय खूप शहाणा होता का? असे त्यांना विचारले होते. हे ऐकून मी खूप हसलो होतो. यावरुन मला असं लक्षात आलं की सर्वजण त्या वयात तसेच असतात. फक्त म्हातारे झाले, केस पांढरे झाले की त्यांना पवित्र व्हायला लागतात. सर्व म्हातारे हे तरुणपणी खट्याळ असतात.

“जर तुम्हाला आवडली तर ती कोण आहे, कोणत्या जातीची आहे, धर्म कुठला आहे याचा अर्थ ते प्रेम स्वाभाविक नाही. प्रेमातही आधी आजूबाजूला चेक करुन पडावं लागतं. कोणत्या जातीचा, धर्माचा तो व्यक्ती आहे त्यानंतर त्याच्या प्रेमात पडायचं. हे मला खूप जाणवत होतं”, असे नागराज मंजुळेंनी सांगितले.

आणखी वाचा : “इयत्ता ४ थीत असताना दारु प्यायचो, पण सातवीत…” नागराज मंजुळेंनी व्यसनाबद्दल केले थेट वक्तव्य

दरम्यान नागराज मंजुळे हे लवकरच ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. येत्या मार्च महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 17:02 IST
Next Story
‘पठाण’ला टक्कर देत ‘वेड’ चित्रपटाने जगभरात कमावले इतके कोटी; कमाई पाहून रितेश देशमुखची वहिनीही भारावली, म्हणाली…