प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट येत्या मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराज मंजुळे यांना कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. नागराज मंजुळे यांनी ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहे. नुकतंच नागराज मंजुळे यांना दारु आणि सिगारेट याबद्दल त्यांचे मत मांडले. यावेळी त्यांनी त्यांच्या व्यसनाबद्दलही भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागराज मंजुळे हे इयत्ता चौथीत शिकत असताना त्यांना दारुचे व्यसन लागले होते. त्यांचे वडील हे दारू प्यायचे, त्यामुळे त्यांच्या घरात बाटल्या असायच्या. याच बाटलीतली दारु ते पाणी न टाकता प्यायचे आणि वडिलांना समजू नये म्हणून हापस्याचे पाणी त्यात भरून ठेवायचे. मात्र सात​​वीत असताना त्यांचे हे दारूचे व्यसन कसे सुटले? यावरुन त्यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ‘तुम्ही माझा खूप अभ्यास केलाय’, अशी मिश्किल टिप्पणी करत यावर सविस्तर उत्तर दिले.
आणखी वाचा : “जगभरात कुठंही अशुद्ध भाषा…” नागराज मंजुळेंचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

यावेळी ते म्हणाले, “माझा धरणं आणि सोडणं याबद्दल अजिबात विश्वास नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की ते व्यसन असते. ते वाईट असतं आणि हानिकारकही असतं, याची सर्वांनाच कल्पना आहे. आपण एखाद्याची आपण सेवा करतो म्हणजे उदा. जर आपण एखाद्याचे पाय दाबून देत असू तर काही काळासाठी ते चांगलं वाटतं, पण मग सतत पाय दाबत राहिलं तर तो माणूस मरून जाईल. जास्त खायला घातलं तर तो माणूसही जिवंत राहणार नाही.”

“व्यसन म्हटलं तर दारु आठवते हे मला जरा खटकतं. कोणाला कशाचं व्यसन आहे काहीही सांगू शकत नाही. मला तर अनेक गोष्टींचं व्यसन आहे. दारु वाईट नाही पण त्याचा अतिरेक केला की ते घातक ठरतं. अनेक जण सिगारेट ओढतात हे एक व्यसनच आहे, पण त्याची ओढण्याची स्टाईल भारी असल्यामुळे लोकांना खूप भारी वाटतं. तंबाखूचं व्यसन अनेकांना आहे, पण ते दिसायला बरं नाही दिसत त्यामुळे ही गोष्ट लपून केली जाते. पण सिगारेट ओढणं म्हणजे ती व्यक्ती मोठी आहे असे मानले जाते. माझ्या ओळखीतील काही माणसं आहेत, त्यांना ओळखीतले लोक दिसली तरच ती लोक सिगारेट दाखवून ओढतात. पण तेच जेव्हा एकटे असतात तेव्हा त्यांना सिगारेटची कधीच आठवण येत नाही.

पण जोपर्यंत लोकं समोर आहेत तोपर्यंत सिगरेट पेटवायची आणि लोकं गेली की लगेच विझवायची. याचा अर्थ तुम्हाला तुमची एक इमेज तयार करायची असते. माणूस अति दारू पिऊन मरतो असं म्हणतात. पण तसं मुळीच नसतं. त्याच्याबरोबर असलेलं दुःख पिऊन तो मरत असतो. आपण दारू सोडा म्हणून सांगतो पण त्याच्या समस्या सोडवायचा कोणी प्रयत्न करत नाही. त्यामुळे ही गोष्ट खुप गुंतागुंतीची आहे. यात मला काळं पांढरं करु वाटत नाही. माझी ती इच्छा नाही. चित्रपटात जसं कोणाला तरी नकारात्मक भूमिकेसाठी बनवावं लागतं, मग त्यात दारूला केलं जातं. पण माणसं वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिलन असतात. दारू, सिगारेट वाईट नाही. पण त्याचं व्यसन खूप वाईट आहे”, असे नागराज मंजुळेंनी सांगितले.

आणखी वाचा : नागराज मंजुळेंनी मराठी भाषेबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले “मराठीवर प्रभुत्व असणारी…”

दरम्यान नागराज मंजुळे हे लवकरच ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर पोलिस व गुन्हेगार यांच्याभोवती फिरणारी ही चित्रपटाची कथा आहे असं दिसून येत आहे. येत्या मार्च महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director nagraj manjule talk about stated drinking alcohol in 4th standard and then reveled during interview nrp
First published on: 30-01-2023 at 16:26 IST