महाराष्ट्रात काही दिवसांपासून हिंदी-मराठी भाषा वाद हा चांगलाच चर्चेत आहे. त्यावर मराठी कलाविश्वातूनही अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या सर्वच कलाकारांनी महाराष्ट्रात मराठीच असली पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनीसुद्धा मराठी-हिंदी भाषा वादावर आपली ठाम भूमिका मांडली.

‘लल्लनटॉप’शी साधलेल्या संवादात श्रीरंग गोडबोले म्हणाले, “भारतात विविध भाषा आहेत आणि त्या प्रत्येक भाषेचं सौंदर्य आहे. भाषेचं आदानप्रदान खूप वर्षांपासून सुरू आहे आणि हेच अपेक्षित आहे. मराठी कविता जगभरात पोहोचल्या पाहिजेत. कवितांचं भाषांतर होणं गरजेचं आहे आणि हे होत आहे. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. प्रमाण मराठी भाषा सोडून अनेक बोलीभाषा आहेत.”

त्यानंतर ते म्हणतात, “अहिराणी, आगरी, वऱ्हाडी, अहिराणी, मालवणी यांसारख्या अनेक बोलीभाषांचं सांस्कृतिक सपाटीकरण होत आहे. या भाषा नष्ट होत आहेत. त्याचं कारण सगळा व्यवहार हा प्रमाण मराठीत सुरू आहे. मुंबईचे सगळे व्यवहार हिंदीत सुरू आहेत आणि हे का होत आहे? तर व्यवहाराची भाषाच ती आहे. मुंबईची निर्मिती झाली, १०५ हुतात्म्यांमुळे मुंबई महाराष्ट्राची झाली. तरीही मुंबईची भाषा मराठी झाली नाही.”

महाराष्ट्रात हिंदी सक्ती होत असेल, तर आम्हाला त्याचं दु:ख : श्रीरंग गोडबोले

त्यानंतर श्रीरंग गोडबोले म्हणतात, “एक मराठी म्हणून मी माझ्या मनात मराठीला कमी लेखलं जात आहे का? हा विचार येतो आणि त्यावर मी विचारपूर्वक सांगतो की, हो… हे होत आहे. याच दृष्टिकोनातून जर महाराष्ट्रात हिंदी सक्ती होत असेल, तर आम्हाला त्याचं दु:ख होत आहे. मी शाळेत असताना मराठीसह हिंदी, इंग्रजी व संस्कृत शिकलो. मग मुंबईत राहत असल्यानं माझे अनेक शेजारी ही गुजराती होते, त्यामुळे मी ती भाषासुद्धा शिकलो. मला कोकणी भाषासुद्धा आवडते, मी तीसुद्धा बोलतो. त्याशिवाय मी जर्मन भाषाही शिकलो आहे.”

पुढे त्यांनी सांगितलं, “मला कोणत्याच भाषेची समस्या नाही किंवा त्याबद्दल वाद नाही. मुद्दा इतकाच आहे की, तुम्ही त्रिभाषा सूत्रानुसार, हिंदी भाषेची सक्ती का करत आहात? आम्हाला मंटो आवडतो, प्रेमचंद आवडतात. आम्हाला हिंदी साहित्य आवडतं. हिंदी सिनेमा आवडतो. हिंदी संगीतही आवडतं. आमच्या लता मंगेशकरांनी बहुतांश हिंदी गाणीच गायली आहेत. त्यामुळे आम्हाला हिंदीबद्दल काही प्रश्न नाही, प्रश्न त्या विषयाच्या सक्तीचा आहे.”

भाषावाद हा राजकीय मुद्दा नाही, तर राजकारणाच्याही पलीकडचा मुद्दा : श्रीरंग गोडबोले

त्यानंतर त्यांनी म्हटलं, “तुम्ही या सगळ्याला राजकारण म्हणत असाल, तर मग हे राजकारण आजचं नाही किंवा जर तुम्ही म्हणत असाल की, हा राजकीय प्रश्न आहे, तर हा फक्त राजकीय प्रश्न नाही. हा मुद्दा राजकारणाच्याही पलीकडचा आहे. भाषावार प्रांतरचना झाली आणि त्यानंतर महाराष्ट्राला मुंबईपासून वेगळं करण्याचा विचार होता, तेव्हापासून हे सुरू आहे. मराठी लोकांसाठी हा भावनिक मुद्दा आहे. याला राजकीय प्रश्न मानू नका.”

पुढे ते म्हणतात, “राजकारणाला बाजूला ठेवून तुम्ही एखाद्या सामान्य मराठी माणसाला हा प्रश्न विचाराल की ‘हिंदी सक्ती योग्य आहे की अयोग्य’? तर सगळेच ते चूक असल्याचं सांगतील. तुम्ही सक्ती का करत आहात? तिसरी भाषा म्हणून जर मला वाटतं की, मी संस्कृत शिकावं. तर ते का होऊ नये? पण आता तुम्ही म्हणाल, त्यासाठीचे शिक्षक आपल्याकडे नाहीत. त्याच्यासाठीच्या पायाभूत सुविधा नाहीत. पुस्तके नाहीत. मग तुम्ही हा निर्णय आणायलाच नको. तुम्ही या सगळ्याचा विचार करा, मग तुम्ही सक्ती करा. त्यामुळे मी या सक्तीच्या पूर्णपणे विरोधात आहे आणि यात कोणतंही राजकारण नाही.”

पुढे ते म्हणाले, “मराठी सिनेमांना हिंदी सिनेमांशी टक्कर द्यावी लागत आहे. व्यवसायात मराठी माणसाला दाबलं जात आहे हे खरं आहे. व्यापाऱ्यांनी मराठी बोर्ड लावण्याला विरोध केला, हे चुकीचं नाही का? त्यांनी मराठीत बोर्ड लावणं आणि त्यासाठी आग्रह केला जात असेल, तर हे योग्यच आहे. हा मुद्दा राजकीय आहे किंवा आगामी निवडणुकांसाठी हे सगळं केलं जात आहे; तर तसं नाही. आम्हाला हिंदी सक्ती नको.”

त्यानंतर त्यांनी मराठी भाषा न बोलण्यावरून होत असलेल्या हिंसेबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. त्याबद्दल श्रीरंग गोडबोले, “हे व्हायला नको. कारण- भाषा हिंसेचं मूळ असू नये; तर भाषा प्रेमाचं मूळ असलं पाहिजे. पण हे का होत आहे? याचं कारण तुम्हाला शोधावं लागेल आणि त्यासाठी या मुद्द्याला राजकारणापासून वेगळं ठेवलं पाहिजे. मुंबईत नुकतीच एक घटना घडली, त्यात एक माणूस म्हणाला की, जीव गेला तरी मी मराठी बोलणार नाही, तर हा वादाचा मुद्दा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते सांगतात, “एका समाजाचे लोक म्हणतात की, ‘मराठी तुमची, भांडी घासा आमची’. याचा अर्थ असा की, तुम्ही मराठी आहात; तर तुम्ही आमची भांडी घासा. तुमची तीच कुवत आहे. तर यातून वाद निर्माण होण्यासाठी आपणच संधी देत आहात. हा आजचाच मुद्दा नाही. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाल्यापासूनची ही एक दुखरी नस आहे.”