मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे काही आठवड्यांपूर्वी निधन झाले. १५ जुलैला पुण्यातील फ्लॅटमध्ये ते मृतावस्थेत आढळले होते. फ्लॅटमध्ये ते एकटेच राहत असल्याने त्यांच्या निधनाबाबत कुटुंबीयांना पोलिसांकडून माहिती देण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणी दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनीला ट्रोल करण्यात आले होते.
गश्मीर महाजनीने वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेतला होता. यानंतर काही दिवसांनी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत त्याने वडिलांच्या निधनानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले होते. पुढे, इन्स्टाग्रामवर प्रश्न-उत्तरांचे सेशन घेऊन अनेकांच्या प्रश्नाला त्याने उत्तरे दिली. आता अभिनेत्याने वडिलांच्या निधनानंतर नुकतीच त्याची पहिली इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : AskSrk : “शाहरुख सर शिव्या द्या, पण…”, चाहत्याच्या अजब मागणीवर किंग खान म्हणाला, “जॅकी श्रॉफकडून…”
गश्मीरने त्याचा फोटो शेअर करत हास्य (SMILE) यावर आधारित कॅप्शन लिहिले आहे. यामध्ये अभिनेता लिहितो, “हास्य…आयुष्यातील कठीण प्रसंगात हसायला शिका…हास्य हे सगळ्या गोष्टींवरील उपाय आहे. रात्री चंद्राकडे पाहण्यासाठी मी जेव्हा आकाशात पाहतो तेव्हा तो चंद्र काळ्या ढगांनी झाकलेला असतो. त्या काळ्या ढगांना पाहून मी सहज हसतो आणि ढगांमधून माझ्या चेहऱ्यावर पावसाच्या थेंबांचा वर्षाव होतो. गडद अंधारात तुमच्या एका स्मितहास्यामुळे खूप फरक पडू शकतो.”
गश्मीर महाजनीच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत “तुला हसताना पाहून आम्हाला खूप छान वाटले”, “तू कायम असाच हसत राहा”, “खूप सुंदर कॅप्शन गश्मीर” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.