Genelia Deshmukh’s Post For Priya Bapat : प्रिया बापट व उमेश कामत यांच्याकडे मराठी मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. सध्या हे दोघंही त्यांच्या ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. प्रिया-उमेशच्या जोडीला कायमच प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं. त्यांच्या या नव्या सिनेमाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहा असं आवाहन प्रेक्षकांना केलं आहे.

यादरम्यान, प्रिया-उमेशला ‘बिन लग्नाची गोष्ट’साठी एका खास व्यक्तीने शुभेच्छा दिल्या आहेत. ती खास व्यक्ती म्हणजे जिनिलीया देशमुख. जिनिलीया वहिनींनी प्रिया-उमेशच्या सिनेमासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. इतकंच नव्हे तर तिने प्रियाने गायलेल्या एका गाण्याचं कौतुक देखील केलं आहे.

जिनिलीया ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिते, “तुमच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बिन लग्नाची गोष्ट’ या मराठी सिनेमासाठी तुमचं खूप-खूप अभिनंदन! तुमच्या सिनेमाला सध्या खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि हे पाहून मलाही खूपच आनंद झालाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रिया तू गायलेलं गाणं किती सुंदर आहे मला खूप आवडलंय. तुम्ही सुद्धा हा सिनेमा जरूर पाहा.” या पोस्टमध्ये जिनिलीयाने प्रिया बापट आणि उमेश कामत यांना टॅग केलं आहे. तसेच प्रियाने गायलेल्या “पण या ईगोचं करायचं काय…” या गाण्याचं कौतुक केलं आहे. हे गाणं प्रियासह ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांनी गायलं आहे.

genelia
प्रिया बापटसाठी जिनिलीयाने शेअर केली खास पोस्ट

जिनिलीयाची इन्स्टाग्राम स्टोरी प्रिया-उमेशने रिशेअर केली आहे. “जिनिलीया तुझे खूप खूप आभार…तुझ्या शुभेच्छा मिळणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.” असं म्हणत या दोघांनीही कृतज्ञता व्यक्त केली आहे.

दरम्यान, ‘बिन लग्नाची गोष्ट या सिनेमात प्रिया-उमेशसह निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने असे लोकप्रिय कलाकार एकत्र झळकणार आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित या सिनेमाचे सुनील बियानी, पवन मेहता आणि नितीन प्रकाश वैद्य निर्माते आहेत.