Genelia Deshmukh Shares Ganpati Visarjan Video : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभरातील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील गणपतींना निरोप दिला जात आहे. राज्यभरातील विविध ठिकाणी भक्तीमय वातावरणात गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. गेले दहा दिवस मनोभावे पूजन केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे.
अनेक सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करताना दिसतात. मराठीसह अनेक बॉलीवूड कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान होतो, त्याच बाप्पाला आज निरोप दिला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी यानिमित्ताने सोशल मीडियावर बाप्पाच्या निरोपाचे काही क्षण शेअर केले आहेत.
अशातच जिनिलीया देशमुखनेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर देशमुखांच्या घरच्या बाप्पाच्या निरोपाचा व्हिडीओ शेअर केला आहे. जिनिलीया देशमुख सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती अनेक सणवारांनिमित्तही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
देशमुखांच्या घरी सर्वच सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या प्रत्येक सणाची अपडेट जिनिलीया सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसते. अशातच तिने घरच्या बाप्पाला निरोप देतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये रितेशने हातात बाप्पाची मूर्ती घेतली असून त्याच्याबरोबर रियान आणि राहिल ही दोन्ही मुलं दिसत आहेत. तसंच या व्हिडीओत रितेश ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असं म्हणत असून त्याच्यामागे त्याची मुलंही त्याला साथ देत आहेत. “निरोप हा नेहमीच दु:खद असतो, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” असं म्हणत जिनिलीयाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, रितेश-जिनिलीया ही बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी आहे. दोघांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना कायमच आवडते. मुलांवर केलेले संस्कार तसंच मराठमोळी संस्कृती जपल्याबद्दल रितेश-जिनिलीया यांचं चाहत्यांकडून सोशल मीडियावर कायमच कौतुक केलं जातं.