गेल्या काही महिन्यांपासून ‘हर हर महादेव’ या ऐतिहासिक चित्रपटावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील लढाईवरुन वाद निर्माण झाला होता. या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचे बोललं जात होतं. त्यातच हा चित्रपट लवकरच टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणार होता. यावरुन संभाजी ब्रिगेडने आक्रमक पावित्रा घेतल्यानंतर आता अखेर निर्मात्यांनी एका पाऊल मागे घेतले आहे.

नेमकं प्रकरण काय?

‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा वाद गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सुरु आहे.  या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील लढाईवरुन वाद निर्माण झाला होता. या चित्रपटातील अनेक वादग्रस्त दृश्य आणि प्रसंगाबाबत संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, सरदार कृष्णाजी बांदल यांच्याबाबत अतिशय चुकीचा आणि आक्षेपार्ह इतिहास मांडल्याचे बोललं जात आहे. या विरोधात संभाजी ब्रिगेडने चित्रपटगृह बंद पाडली होती. त्याबरोबरच त्यांनी आक्रमक पावित्राही घेतला होता.
आणखी वाचा : “बालभारतीच्या पुस्तकातील वाचलेल्या गोष्टी म्हणजे इतिहास नव्हे…” ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाची रोखठोक भूमिका

या सर्व वादामुळे ‘हर हर महादेव’ हा चित्रपट चित्रपटगृहात जास्त काळ टिकला नाही. त्यानंतर आता येत्या १८ डिसेंबरला हा चित्रपट झी मराठीवर वाहिनीवर दाखवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयालाही संभाजी ब्रिगेडने विरोध केला. ‘हर हर महादेव’ या चित्रपटासारखे चुकीची माहिती देणारे चित्रपट टीव्हीवर दाखवू देणार नाही, असा आक्रमक पवित्र संभाजी ब्रिगेडने घेतला होता. संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर निर्मात्यांनी एका पाऊल मागे घेतले आहे. या चित्रपटातील वादग्रस्त दृश्य काढून झी स्टुडिओ हा चित्रपट टीव्हीवर दाखवणार आहे.  

झी स्टुडिओच्या मुंबईतील कार्यालयात आज १४ डिसेंबर २०२२ रोजी संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी याबद्दल परखड भूमिका घेतली होती. त्यानंतर झी स्टुडिओने एका पाऊल मागे घेतले आहे. याबद्दल एक पत्र शेअर केले आहे.

झी स्टुडिओचे पत्र

“आज आपण बैठकीत चर्चा केल्याप्रमाणे ‘हर हर महादेव’ या चित्रपटातील काही वादग्रस्त दृश्य आणि प्रसंग वगळण्याचा किंवा ते हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दृश्य हटवल्यानंतरच येत्या १८ डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित केला जाईल, याची नोंद घ्यावी”, असे या पत्रात म्हटले आहे.

आणखी वाचा : “एकीकडे जय शिवराय म्हणता अन् दुसरीकडे…” ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाची स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हर हर महादेव’ सिनेमात अभिनेता सुबोध भावेनं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारली आहे. तर अभिनेता शरद केळकरनं  बाजीप्रभू देशपांडेंची प्रमुख भूमिका साकारली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केलं आहे. अफजलखान वध आणि पावनखिंडींतील थरार सिनेमात दाखवण्यात आला आहे.