Aranya Teaser released: ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’, ‘नामदेव बी एस्सी अॅग्री’, ‘जाऊ बाई गावात’, ‘तुझ्यात जीव रंगला’ या चित्रपट, मालिका आणि रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन अशा विविध भूमिकांतून अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या सगळ्यात ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील त्याची राणा दा ही भूमिका मोठी गाजली. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आजही अभिनेत्याला राणा दा म्हणून ओळखले जाते. आता प्रेक्षकांचा लाडका राणा दा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘अरण्य’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘अरण्य’ या चित्रपटातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरच्या सुरुवातीलाच एक मोठे जंगल पाहायला मिळते. त्यानंतर हार्दिक जोशीची एंट्री होते. तो म्हणतो, “मला माझी लोकं या जंगलाचा वाघ म्हणायची.” पुढे त्याच्या हातात एक बंदूक पाहायला मिळत आहे. तो म्हणतो, “बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली, तेव्हापासून सगळंच बदललं.

पुढे चित्रपटातील इतर कलाकारांची झलक पाहायला मिळते. सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, विना जगताप, चेतन चावडा, हृतिका पाटील हे कलाकार दिसत आहेत. प्रोमोमध्ये हार्दिक जोशी व चेतन चावडा ही पात्रे एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. हार्दिक म्हणतो, एक ध्यानात ठेव, वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार. टीझरमध्ये पुढे एका लहान मुलीचा आवाज ऐकायला मिळतो. ती म्हणते, बाबा सांग ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटतेय.”

शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे; तर अमोल दिगंबर करंबे यांनी लेखन व दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. आता हार्दिक जोशीला बऱ्याच दिवसांनंतर पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

या चित्रपटात अभिनेत्री वीणा जगतापची देखील झलक पाहायला मिळाली. आता तिची नेमकी भूमिका काय असणार, हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे. सध्या अभिनेत्री ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत तिने ऐश्वर्या ही भूमिका साकारली असून ती मालिकेतील खलनायिका आहे.

दरम्यान, ‘अरण्य’ चित्रपटातून हार्दिक जोशीला पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.