Hruta Durgule on money management: अभिनेत्री हृता दुर्गुळेचा आरपार हा चित्रपट आज १२ सप्टेंबर २०२५ ला प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा होताना दिसत होती.
आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत ती आर्थिक नियोजन कशी करते, याबद्दल वक्तव्य केले. तिने सुमन म्युझिक मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत हृताला मनी मॅनेजमेंटविषयी विचारले.
“त्यासाठी ५० लाख…”
हृता म्हणाली, “जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली, तेव्हा मी १७ वर्षांची होते.पहिली १० वर्षे तर वेळेत इएमआय जाणार का , वेळेत इतर गोष्टींसाठी पैसे मिळणार आहेत का, हा प्रश्न असायचा. तुमचं रोजचं जगणं सोपं व्हावं, हाच मुद्दा होता. त्यामुळे आर्थिक नियोजन करण्याशिवाय पर्यायच नव्हता.”
पुढे अभिनेत्री म्हणाली, “मला गरीब म्हणून मरायचं नाहीये. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की, मी माझ्या पुढच्या पिढीसाठी करून ठेवेन. हे मी माझ्यासाठी करते. त्याबद्दल मला खूप स्पष्टता आहे. माझी स्वत:ची काही ध्येये आहेत. त्यासाठी मी मेहनत घ्यायला तयार आहे. त्यामुळे मी माझ्या बचतीच्या बाबतीत अत्यंत काटेकोर आहे. कधी कधी माझे आई, भाऊ म्हणतात की, आलेल्या सगळ्याच पैशांची कशी गुंतवणूक करते. म्हणजे काहीतरी खर्च कर, असं त्यांचं म्हणणं असतं. आता लग्नानंतर मी स्वत:वर खर्च करायला लागली आहे. मी गेल्या वर्षी पहिल्यांदा माझी प्रीमियम गाडी घेतली. पण, मी त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले नाहीत.”
हृता म्हणाली, “आर्थिक नियोजन हे प्रत्येक माणसासाठी महत्त्वाचे आहे. तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये किती पैसे आहेत, याने काही फरक पडत नाही. तुमच्याकडे तुमची छोटी रक्कम असेल ना, तरी त्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास येतो. त्यासाठी ५० लाख किंवा ५० कोटींची गुंतवणूक पाहिजे असं नाही. आर्थिक स्वातंत्र्य मला मी एक प्रोजेक्ट केल्यानंतरही मिळतं. त्यामध्ये कमी पैसे असले तरी ते पैसे माझे असतात. हे मला १७ व्या वर्षीच समजलं होतं. “
दरम्यान, हृता दुर्गुळेबरोबर आरपार चित्रपटात ललित प्रभाकरदेखील प्रमुख भूमिकेत आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.