Jatra Movie Artist Reunion Kranti Redkar Shrared A Video : केदार शिंदे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे आणि ‘जत्रा’ हा त्यातीलच एक. ‘जत्रा’ चित्रपट आला तेव्हा त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला. अशातच आता अभिनेत्री क्रांती रेडकरने नुकतीच यासंबंधित पोस्ट केली आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित ‘जत्रा’ चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झालेला. यामध्ये अभिनेते भरत जाधव व क्रांती रेडकर झळकले होते. त्यांच्यासह यामध्ये इतरही लोकप्रिय कलाकार पाहायला मिळालेले. अशातच आता क्रांती रेडकरने या चित्रपटातील कलाकारांबरोबर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

क्रांतीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेते भरत जाधव, प्रिया बेर्डे, सिद्धार्थ जाधव, केदार शिंदे व स्वत: क्रांती पाहायला मिळत आहे. यामध्ये ते ‘जत्रा’च्या ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधव एन्ट्री घेताना हाताने दोन असा इशारा करताना दिसतो, त्यामुळे आता या चित्रपटाचा दुसरा भाग अखेर येणार का, असा प्रश्न उपस्थित होतो.

क्रांती रेडकरने शेअर केलेल्या या व्हिडीओला “आर लिटील जत्रा रियुनियन. आम्ही चित्रपटातील इतर लोकांना मिस केलं, पण आज खूप हसलो. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या… तुम्ही आम्हाला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहात का?” अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं असून कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली “आता जत्रा २ आला पाहिजे”, “आवडता चित्रपट आजवर १०० वेळा पाहिला असेल”, “जत्रा २ ची वाट बघतोय”, “मॅम जत्रा २ कधी येणार”, “जत्रा २ साठी उत्सुक आहोत”, आवडतं गाणं अशा कमेंट्स केल्या आहेत.

केदार शिंदे दिग्दर्शित ‘जत्रा’ हा मराठी सिनेसृष्टीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. अनेक जण आजही पुन्हा पुन्हा हा चित्रपट पाहाताना दिसतात. यातील गाणी, पात्र या गोष्टींनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

क्रांती रेडकरच्या व्हिडीओखालील कमेंट्स

माध्यमांच्या वृत्तानुसार २०२२ मध्ये ‘जत्रा २’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी गुढीपाडव्याच्या दिवशी या चित्रपटातील अभिनेते भरत जाधव यांनी ‘जत्रा २’चं एक टीझर शेअर केलं होतं. परंतु, हा चित्रपट काही प्रदर्शित झाला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा यासंबंधित व्हिडीओ क्रांती रेडकरने शेअर केला आहे, त्यामुळे आता खरंच ‘जत्रा २’ येणार का? याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असल्याचं पाहायला मिळते.