हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. उद्या शुक्रवारी २४ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, आणि पोस्टरला भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी देशपांडे दिसत नसल्याने काही चाहते नाराज झाले आहेत. मात्र आता त्या दोघी या चित्रपटात का नाही, याचे कारण समोर आलं आहे.

‘झिम्मा २’ या चित्रपटाच्या निमित्ताने यातील कलाकारांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सहभागी होऊन दिलखुलास गप्पा मारल्या. त्यावेळी हेमंत ढोमेला ‘झिम्मा २’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले का नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने सविस्तर उत्तर दिलं.

हेमंत ढोमे काय म्हणाला?

‘झिम्मा २’ या चित्रपटात सोनाली आणि मृण्मयी का नाही, यामागचं थेट कारण मी तुम्हाला सांगतो. सोनाली आणि मृण्मयी या पात्रांचं पुढे काय होणार याचा मी विचार करत होतो. दुसऱ्या भागाची कथा मी करत असताना सोनाली (मैथिली) च्या पात्राचे मला उगाचच ओढून ताणून काही करायचं नव्हतं. झिम्माच्या पहिल्या भागात त्याचा गोड शेवट आम्ही दाखवला होता. निखिल मैथिलीला मारहाण करतो, असं काही मला त्यात दाखवायचं नव्हतं. मला उगाचच हवा भरायची किंवा पाणी भरायचं असं काही त्या पात्रामध्ये करायचं नव्हतं.

तसेच रमा हे मृण्मयीचं जे पात्र आहे, त्यात ती पहिल्या भागात मूल होणार असं सांगत असते. त्यामुळे तुम्ही चित्रपट पाहिलात तर तुम्हालाही हे नक्की कळेल. त्याबरोबरच जर प्रेक्षकांनी ‘झिम्मा २’ वर भरभरुन प्रेम केलं आणि आम्ही जर तिसरा भाग बनवला तर त्या पुन्हा दिसतीलही, असे वक्तव्य करत हेमंत ढोमेने ‘झिम्मा ३’ या चित्रपटाचे संकेतही दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘झिम्मा २’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात इंदू डार्लिंगचा ७५ वा वाढदिवस, नवीन ट्रीपचे प्लॅनिंग आणि एक सरप्राईज असा सस्पेन्स पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग, रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे झळकत आहेत. त्याबरोबरच यात सिद्धार्थ चांदेकरही पाहायला मिळत आहे.