Kedar Shinde Instagram Video : सोशल मीडियाच्या या काळात एखादा माणूस किंवा त्याची कला अगदी सहज अनेकांपर्यंत पोहोचते. तसंच या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांकडून गरजू व्यक्तींनासुद्धा मदत केली जाते. सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीला गरज हवी असल्याचं कळताच अनेक दानशूर व्यक्ती या गरजूपर्यंत पोहोचतात आणि त्यांना योग्य ती मदत मिळते. असंच काहीसं झालं आहे, यवतमाळमधील एका आजोबांबरोबर.
काही दिवसांपूर्वी आषाढी वारीच्या दिवसात सोशल मीडियावर एक इंगोले नावाचे आजोबा व्हायरल झाले होते. हातात पेटी (हार्मोनियम) घेत विठुरायाची गाणी गातानाचे त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनीसुद्धा या आजोबांच्या गाण्याचे व्हिडीओ शेअर केले होते. तसंच अनेकांनी त्यांच्या गायनाचंसुद्धा कौतुक केलं होतं.
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यापर्यंतसुद्धा या आजोबांचा व्हिडीओ पोहोचला. केदार शिंदेंनी इन्स्टाग्राम रीलवर या आजोबांचा गाणं गातानाचा व्हिडीओ पाहिला. त्यानंतर केदार शिंदेंने या आजोबांना एक पेटी (हार्मोनियम) द्यावी असा विचार केला आणि नुकतीच ही हार्मोनियम पोहोचलीसुद्धा. याचा एक सुंदर असा व्हिडीओ स्वत: केदार शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत केदार शिंदे असं म्हणतात, “स्वामी कृपेने हार्मोनियम इंगोले आजोबांच्या हाती सुपूर्द झाली. मी इन्स्टाग्रामवर हे आजोबा पंढरपूर वारी करून परतत असताना रस्त्यात पेटी वाजवतानाचा व्हिडीओ पाहिला. मनापासून इच्छा होती, त्यांना नवी कोरी हार्मोनियम द्यायची. पत्ता नव्हता. फोन नंबर नव्हता. तेव्हा राहुल धांडे यांनी त्यांच्या नातवाचा फोन नंबर मिळवून दिला. यवतमाळ येथील एका गावात आजोबा राहतात. त्यांच्या तालुक्यातील झापटे हार्मोनियम दुकानातून ही हार्मोनियम उपलब्ध करून घेतली आणि त्यांना ती मिळाली. स्वामी आहेत, तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार.”
केदार शिंदेंनी केलेल्या या कृतीचं कौतुक होत आहे. या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी केदार शिंदेंनी त्या आजोबांना दिलेल्या हार्मोनियमसाठी धन्यवाद म्हणत त्यांचं कौतुक केलं आहे. “तुमच्या माणुसकीला सलाम”, “सर, तुम्ही नेहमीच अशा छोट्या मोठ्या कलाकारांना ऊर्जा देण्याचे काम करता, खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात”, “खूपच छान”, “एक सच्चा कलाकारच दुसऱ्या कलाकाराला ओळखू शकतो आणि त्याला अशी दाद देऊ शकतो” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, ‘अग्गबाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘बाईपण भारी देवा’ तसंच नुकताच आलेला ‘झापुक झुपूक’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. त्यानंतर आता ते आगामी काळात कोणता नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.