Kedar Shinde Not Talk To Bharat Jadhav For Nine Months : मनोरंजन विश्वातल्या मैत्रीची कायमच चर्चा होताना दिसते. मराठी इंडस्ट्रीतही असे काही जिवलग मित्र आहेत, ज्यांच्या मैत्रीचे आजवर अनेक किस्से ऐकले किंवा वाचले असतील. मराठी इंडस्ट्रीतल्या जिवलग मित्रांबद्दल बोललं जातं; तेव्हा केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी या त्रिकुटाचं नाव कायमच घेतलं जातं.
गेल्या अनेक वर्षांपासून केदार, भरत व अंकुश जाधव यांच्यातली ही मैत्री तशीच आहे; मात्र तुम्हाला माहीत आहे का? या तिघांपैकी केदार आणि भरत यांच्यात काही कारणावरून मतभेद झाले होते; ज्यामुळे हे दोघे नऊ महिने एकमेकांशी बोलत नव्हते. त्याबद्दल स्वत: केदार शिंदे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
केदार शिंदेंनी मुक्काम पोस्ट मनोरंजन या यूट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना, “गेल्या ५० वर्षांत तुमची मैत्री कशी राहिली. या काळात, ज्यामुळे तुम्ही संपर्कात नव्हता किंवा राग वगैरे आला म्हणून तुम्ही बोललाच नाहीत असं काही झालंय का?” असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा केदार शिंदे म्हणाले, “अंकुश चौधरीबरोबर असं कधी झालं नाही. गेली ५० वर्षे आम्ही एकत्र होतो. अजूनही आहोत आणि यापुढेही ५० वर्षे एकत्र राहू. जो काही वाद किंवा संवाद झाला होता; तो भरत जाधवबरोबर झाला होता.”
त्यानंतर केदार शिंदे म्हणतात, “आपल्या मैत्रीत या गोष्टीसुद्धा होतात. मी हे अजिबात नामंजूर करणार नाही. भरत माझ्याच बिल्डिंगमध्ये राहायचा. मी आठव्या मजल्यावर आणि भरत दहाव्या मजल्यावर राहत होता. ही ‘सही रे सही’च्या आधीची म्हणजेच २००० सालची वगैरे गोष्ट आहे. काही मतभेद आणि गैरसमज झाले होते. आम्ही दोघे एकमेकांसमोर यायचो; तेव्हा मी त्याच्याकडे बघत नव्हतो आणि तोसुद्धा माझ्याकडे बघत नसे. आमचे कुटुंब एकमेकांबरोबर बोलायचे. माझी बायको आणि त्याची बायको एकमेकींबरोबर बोलत होत्या; पण मी भरतशी आणि तो माझ्याशी बोलत नव्हतो.”
त्यानंतर केदार शिंदे सांगतात, “मग आठ-नऊ महिन्यांनी अशी गोष्ट घडली की, आम्हालाही कळलं नाही आणि आम्ही पुन्हा बोलायला लागलो. त्यानंतर परत एकत्र आलो. तर तेव्हा काय झालं होतं हे आता मला आठवत नाहीय आणि मला वाटतं, भरतलासुद्धा ते आठवणार नाही. कुठल्या तरी गोष्टीमुळे गैरसमज झाले असतील.”
यापुढे केदार शिंदेंनी भरत आणि अंकुशबरोबरच्या मैत्रीबद्दल असं म्हटलं, “आमच्या तिघांमध्ये आम्ही कोणावरही अवलंबून नाही. मी भरतबरोबर मैत्री करतो; तो मला काम देईल किंवा मी अंकुशबरोबर मैत्री करतो. त्यामुळे तो माझं दिग्दर्शक म्हणून नाव सुचवेल, असं नाही. त्यामुळे आमच्यातली मैत्री संधीपुरती झालेली नाही. हा माणूस माझ्या उपयोगाचा आहे; म्हणून मी मैत्री करेन, असं आमच्यात नाही.”
केदार शिंदे इन्स्टाग्राम पोस्ट
पुढे केदार शिंदे म्हणाले, “आमच्यातले व्यवहार कायमच चांगले राहिलेत. असेही प्रसंग येतात, जिथे मी अंकुशला सांगतो की, मला पैशांची गरज आहे. असे अनेक प्रसंग आले असतील; पण मी असं बघतो की, त्याचे पैसे त्याच्याकडे परत जातील. आता भरत जाधव माझं नाटक करत असेल, तर त्याच्या रॉयल्टीचा सगळा हिशोब तो मला पाठवतो. त्याबद्दल मी कधीच त्याला विचारत नाही. आमच्या मैत्रीत त्या सगळ्या गोष्टी नाहीत. त्याशिवाय आमच्या घरच्यांमध्ये आमच्याबद्दल विश्वास आहे. सुरुवातीला मी भरतकडे जातोय, असं म्हटल्यावर कधी कोणी आडकाठी केली नाही किंवा भरतनंही अंकुशकडे जातोय, असं सांगितल्यावर त्यालाही कधी कोणी काही विचारलं नाही. असं वातावरण तिघांच्याही घरांत होतं.”