Kedar Shinde share Kombadi Palali Song Story : मराठी सिनेसृष्टीतल्या गाजलेल्या आणि लोकप्रिय सिनेमांच्या यादीत येणारा सिनेमा म्हणजे ‘जत्रा’. केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला ‘जत्रा’ हा सिनेमा २००५ साली आला होता. त्यानंतर या सिनेमाला जवळपास २० वर्ष झाली. पण तरी हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
‘जत्रा’मध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, प्रिया बेर्डे, क्रांती रेडकर, उपेंद्र लिमये, विजू खोटे यांच्यासह अनेक कलाकार पाहायला मिळाले. उत्तम कलाकार, संवाद संवाद यामुळे हा सिनेमा मराठीतला एक ‘कल्ट सिनेमा’ म्हणून ओळखला जातो.
ज्याप्रकारे ‘जत्रा’मधील संवाद, पात्र लोकप्रिय झाली, तशीच यातली ‘ये गो ये ये मैना’ आणि ‘कोंबडी पळाली’ ही गाणीही हिट आहेत. २० वर्षांनंतरही या गाण्यांचा रसिकवर्ग आहे. या गाण्यांच्या लोकप्रियतेमुळे तर बॉलीवूडमध्ये या गाण्यांचे हिंदीत रिमेकही झाले आहेत. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी ही दोन्ही गाणी संगीतबद्ध केली आहेत.
यापैकी ‘कोंबडी पळाली’ या गण्याचा तर एक वेगळाच श्रोतावर्ग आहे. अनेक ठिकाणी हे गाणं आजही हमखास वाजतं. पण तुम्हाला माहितीय का हे गाणं सिनेमात एका कारणामुळे नसलं असतं आणि हे कारण होतं PETA! हो… PETA मुळे कदाचित ‘कोंबडी पळाली’ हे गाणं ‘जत्रा’मध्ये नसलं असतं. PETA च्या निर्णयामुळे केदार शिंदेंना हे गाणं सिनेमातून काढून टाकावं लागणार होतं. पण नशीबाने निर्णय उशीरा आला आणि हे गाणं सिनेमात राहिलं. याबद्दल केदार शिंदेंनी नुकताच एक किस्सा सांगितला आहे.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत या गाण्याबद्दल केदार शिंदे म्हणाले, “कदाचित ते गाणं कधी आलंच नसतं. हे गाणं शूट झालं, एडिट झालं. त्यानंतर ‘जत्रा’ सिनेमा सेन्सॉर होऊन आला आणि त्याच संध्याकाळी PETA चा प्राण्यांबद्दलचा नियम आला. जर तो नियम एक दिवस आधी आला असता, तर मला सिनेमातून हे पूर्ण गाणं काढून टाकावं लागलं असतं. कारण या गाण्यात अनेक कोंबड्या आहेत, इथून तिथून त्या उडताना दिसत आहेत आणि यासाठी त्यांनी मला कधीच परवानगी दिली नसती. म्हणजे आज जर एखादी कोंबडी दिसली, तरी सर्टिफिकेट घेऊन फिरावं लागतं. इथे तर आम्ही बाजारच मांडला होता.”
यानंतर केदार शिंदेंनी सांगितलं, “‘कोंबडी पळाली’ हे गाणं लोकांना फारच आवडलं. आता ज्याप्रकारचा सोशल मीडिया आहे, तसाच सोशल मीडिया तेव्हा असता; तर गाणं अजून हिट झालं होत. ‘कोंबडी पळाली’ गाणं आधी रिलीज झालं असतं, तर त्याचा सिनेमाच्या रिलीजसाठीसुद्धा फायदा झाला असता. पण ते गाणं प्रेक्षकांसमोर आलं ते सिनेमा सॅटेलाइटवर आला तेव्हा… त्यानंतर प्रेक्षकांनी त्या गाण्याला उचलून धरलं.”
यानंतर केदार शिंदे यांनी सांगितलं, “हे गाणं भरत जाधव, अंकुश चौधरी आणि अतुल गोगावलेला आवडलं नव्हतं. पण मी आणि अजय गोगावले… आम्ही दोघेच हे गाणं असायला पाहिजे यावर ठाम होतो आणि ते राहिलं. मग नंतर या गाण्याने इतिहासच केला.”