Kedar Shinde Share An Update About Jatra 2 : २००५ साली आलेल्या ‘जत्रा’ हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या सिनेमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आजही या चित्रपटाची जादू कायम आहे. आजही जर हा सिनेमा टीव्हीवर लागला तर रसिक प्रेक्षक आवर्जून हा सिनेमा बघतात. आजही या सिनेमातली गाणी, सीन्स, संवाद प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत.
‘जत्रा’बद्दल कोणतीही अपडेट आली की, चाहते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची मागणी करताना दिसतात. तसंच अनेकदा ‘जत्रा’ पुन्हा रिलीज करणार का? असं विचारतात. अशातच दोन वर्षांपूर्वी ‘जत्रा २’ची घोषणा केली होती. मात्र पुढे त्या सिनेमाबद्दल कोणती अपडेट समोर आली नाही. त्यानंतर आता आता ‘जत्रा २’बद्दल स्वत: केदार शिंदेंनी माहिती दिली आहे.
केदार शिंदेंनी नुकताच लोकमत फिल्मीशी संवाद साधला. या मुलाखतीसाठी केदार शिंदेंसह भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्रिया बेर्डे आणि क्रांती रेडकर हेही सहभागी झाले होते. यावेळी केदार शिंदे ‘जत्रा २’बद्दल असं म्हणाले, “आम्ही ‘जत्रा २’ जाहीर केला होता. ती कथा माझ्याकडे होती. तेव्हा भरतने मला अडवलं होतं, की थोडं थांब. कदाचित या सिनेमाची कथा दुसऱ्या सिनेमाशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे तू चौकशी कर. त्यानंतर मी चौकशी केली तर, त्यातला १० टक्के भाग एका सिनेमाशी जुळत होता, जी तेव्हा येणार होती.”
पुढे केदार शिंदे म्हणाले, “त्यानंतर आम्ही तो सिनेमा करणं थांबवलं. प्रियदर्शन जाधव, ज्याने ‘जत्रा’साठी लिखाण केलं आहे; त्याचाच तो सिनेमा होता. त्याला मी विचारलं. म्हटलं माझीसुद्धा अशीच कथा आहे. त्यावर तो म्हणाला की, थोडी ‘जत्रा २’शी जुळत आहे. मग मी म्हटलं नको करायला…”
यानंतर केदार शिंदेंनी सांगितलं की, “‘जत्रा २’ करताना आता सगळं होईल, पण तरी आम्हाला आमच्याकडेच पुन्हा नव्याने बघण्याची गरज आहे. त्यावेळी आम्ही शुन्य होतो. अर्थात आता काही ग्रेट नाही. पण आता जो अनुभव आला आहे, तो अनुभव बाजूला सारून आम्हाला पुन्हा शून्य म्हणून काम करावं लागेल. तेव्हा एक उस्फुर्तपणा होता.”
यापुढे केदार शिंदे सांगतात, “आम्ही आता कोणतीही गोष्ट करताना दहा वेळा विचार करू. पण तेव्हा तसं काही नव्हतं. तेव्हा एक आवड होती, जी आजही आहे. पण आता त्याला समंजसपणा, समजूतदारपणा आला आहे. पण तेव्हा एक अवखळपणा होता. जो अवखळपणा २० वर्षांनीही आवडतो आहे, यातच सिनेमाचं यश आहे.”
यापुढे त्यांनी सांगितलं की, “खूप लोक मला विचारतात की ‘जत्रा २’ का करत नाहीस? खरं सांगायचं तर मला मनापासून करावसं वाटतं. पण ‘जत्रा’ने असा मोठा बेंचमार्क सेट केला आहे की जर त्या उंचीपर्यंत आपण पोहोचलो नाही तर या ब्रँडला धक्का बसेल. आजही गावागावात मुलं, तरुण, वयोवृद्ध लोक भेटतात आणि ‘आम्ही तुमचा जत्रा पाहिला’ असं प्रेमाने सांगतात. तो माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव असतो.”