‘नटरंग’, ‘फॅन्ड्री’, ‘वाघेऱ्या’, ‘परतु’, ‘बालक-पालक’, ‘जोगवा’, ‘दिठी’, ‘गणवेश’, ‘ऑपरेशन रोमियो’, ‘झुंड’ अशा अनेक चित्रपटांतून एकापेक्षा एक भूमिका निभावत किशोर कदम(Kishor Kadam) यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता मात्र किशोर कदम(Kishor Kadam) हे त्यांच्या चित्रपटामुळे किंवा कोणत्याही भूमिकेमुळे नाही तर त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. गाजलेल्या चित्रपटात काम करूनही त्याचा वैयक्तिक करिअरमध्ये फायदा होत नाही, यावर त्यांनी वक्तव्य केले आहे.

किशोर कदम काय म्हणाले?

किशोर कदम यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारलं की ‘नटरंग’, ‘ऑपरेशन रोमियो’, ‘फॅन्ड्री’, ‘स्पेशल २६’सारख्या गाजलेल्या चित्रपटांत काम केल्यानंतरही वैयक्तिक करिअरमध्ये फायदा होताना दिसत नाही, असं का? यावर बोलताना किशोर कदम यांनी म्हटले, “याचा मी विचार केलेला आहे. मला असं वाटतं की माझ्यामध्ये असलेला कवी आहे, तो कारणीभूत आहे. मी फक्त नट असतो ना, तर मी कदाचित बायोडाटांच्या खूप प्रिंट्स काढल्या असत्या. फोटो सेशन केलं असतं. मी कास्टिंग एजन्सीला जाऊन सगळे फोटो वाटले असते. रोज सकाळी उठून ऑडिशन्ससाठी बाहेर पडलो असतो. हे एक आहे आणि दुसरं मला असं वाटतं की मी मुंबईत जन्मलो व वाढलो आहे. जर मी बाहेरून कुठल्या खेडेगावातून आलो असतो, दिल्लीतून आलो असतो किंवा कोल्हापूरातून, बेळगावातून आलो असतो आणि मुंबईमध्ये संघर्ष करावा लागला असता, वडापाव खावा लागला असता तर मी कदाचित काम शोधलं असतं. मी सुरक्षित वातावरणात जगत होतो. माझ्या आई-वडिलांनी कधी माझ्यावर कुठल्या प्रकारची जबाबदारी दिली नाही. राहायला एक घर होतं, बऱ्यापैकी मध्यमवर्गीय कुटुंब होतं. कुठलंही काम न करता दुबेजींसारख्या गुरूंकडे १६ वर्षे टिकलो. माझे आई-वडील मला पाठिंबा देत होते. झोपायला जागा होती. खायला अन्न होतं. मला असं वाटतं की या सगळ्याचा फरक पडतो, त्यामुळे बाहेरून मुंबईत आलेले लोक जास्त तीव्रतेने काम शोधतात. एकाच खोलीत पेइंग गेस्ट म्हणून वगैरे राहतात, तसं माझ्याबाबतीत झालं नाही. “

काम न करण्यासाठी स्वत:मधील कवी कारणीभूत असल्याच्या त्यांच्या वक्तव्यावर अधिक स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले, “कवीसाठी असलेली संवेदनशीलता आहे ती माझ्यामध्ये खूप प्रमाणात आहे. सततची अस्वस्थता, असुरक्षितता माझ्यामध्ये आहे. असुरक्षितता ही आजूबाजूला जे घडतंय त्याबाबत पडणारे प्रश्न त्याबाबतीत आहेत, त्यामुळे हे सगळं घडतं असं मला वाटतं. ते मला किशोर कदम, ‘सौमित्र’ म्हणून जिवंत ठेवतं. त्याचा फायदा होतोही आणि होत नाही असं मला वाटतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेते किशोर कदम हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या कवितांसाठी ओळखले जातात. सौमित्र या नावानेही त्यांना ओळखले जाते. अनेक विषयांवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. अभिनयासाठी जसा त्यांचा चाहतावर्ग आहे, तसाच त्यांच्या कवितांचादेखील चाहतावर्ग मोठा आहे. आता अभिनेते आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.