Marathi Actress Kranti Redkar : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री व दिग्दर्शिका म्हणून क्रांती रेडकरला ओळखलं जातं. ‘कोंबडी पळाली’ या गाण्याचं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर क्रांतीचा चेहरा येतो. तिने नेहमीच विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. याशिवाय क्रांतीचे रील्स व्हिडीओ चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

क्रांती इन्स्टाग्रामवर रील्स व्हिडीओ शेअर करत तिच्या मुलींचे, आईचे किस्से चाहत्यांना सांगत असते. अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. क्रांती रेडकरला गेल्या काही दिवसांपासून तिचे चाहते मालवणी भाषेत कोणतातरी व्हिडीओ बनव असं सांगत होते. अखेर चाहत्यांच्या विनंतीला मान देऊन क्रांतीने मालवणी भाषेतील भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

क्रांतीने शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘कुछ कुछ होता है’ या लोकप्रिय गाण्याचं मालवणी व्हर्जन तयार केलं आहे. क्रांती व्हिडीओ शेअर करताना म्हणते, “मी मालवणी भाषेत व्हिडीओ बनवावा अशी अनेकांची इच्छा होती… त्यामुळे हा खास व्हिडीओ बनवतेय. लहानपणापासून मी, माझी ताई आणि दुसरी एक बहीण अशा आम्ही बहिणी अनेक हिंदी गाणी आपल्या मालवणी भाषेत गायचो. तर, आज खास तुमच्यासाठी ‘कुछ कुछ होता है’ गाण्याचं मालवणी व्हर्जन सादर करतोय.”

क्रांतीचं भन्नाट गाणं

“तू जवळ इलंस, असो काय तू हसलंस…तूच मेल्या नसती-नसती, स्वप्नं दाखवलंस… आता तर माझा मन, निजना नाय जागता हाय… काय सांगू मेल्या, कसा कसा जागता हाय…” ‘कुछ कुछ होता है’ गाण्याचं अशाप्रकारे मालवणी व्हर्जन क्रांतीने तिच्या बहिणींसह तयार केलं आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला “कसा काय…बरा मा?” असं मालवणी कॅप्शन दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “मस्त लय भारी हा आवडला माका…”, “काय सांगू मेल्या…वाह क्रांती! एपिक व्हिडीओ”, “क्रांती आता हा कंटेट सगळीकडे व्हायरल होईल बघ”, “मस्तच ताई” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.