Kushal Badrike : ‘येरे येरे पैसा’ या चित्रपटाचे आजवर दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यावर आता लवकरच या बहुचर्चित कॉमेडी चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १८ जुलैला ‘येरे येरे पैसा ३’ प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या सिनेमाचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला आहे.

‘येरे येरे पैसा ३’च्या प्रीमियरला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. सिनेमा पाहिल्यावर लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिकेने या सिनेमासाठी आणि दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. कोणताही सिनेमा प्रदर्शित करणं म्हणजे मुलीचं लग्न लावण्यासारखं आहे असं कुशलने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याची ही हटके पोस्ट नेमकी काय आहे? पाहुयात…

कुशल बद्रिके पोस्ट शेअर करत लिहितो, “एक सिनेमा प्रदर्शित करणं म्हणजे पोरीचं लग्न लावण्यासारखं आहे… म्हणजे कसं, मुलीला चांगलं शिकवायचं, छान संस्कार करायचे आणि वयात आली की एखादा मुहूर्त बघून लाऊन द्यायचं लग्न.. आता प्रेक्षक म्हणून सासरची माणसं ठरवणार तिचं भवितव्य! हा आता काही मुली Live In Relationship मध्ये ओटीटीवर राहतात. पण, संजय जाधवांची कन्या चि.सौ.का. ‘येरे येरे पैसा’ ही रितसर लग्न करून थिएटरचा उंबरा ओलांडून तुमच्याकडे येतेय. तिला नांदवा ही विनंती. माझं नातं Audiance म्हणून मुलीच्या सासरकडूनही आहे आणि एक कलाकार म्हणून माहेरकडूनही आहे. म्हणून हक्काने सांगतो, मुलीवर छान संस्कार झाले आहेत. आता तुमच्या शुभ-आशीर्वादांची गरज आहे. बाकी कार्यसिद्धीस श्री आणि ‘AVK’ समर्थ आहेत. आमच्या दादाच्या सिनेमाला यायचं हं! तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, संजय नार्वेकर, नागेश भोसले, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार, सोनाली खरे, बिजय आनंद, वनिता खरात, मीरा जगन्नाथ, जयवंत वाडकर, इशान खोपकर. समस्त ‘येरे येरे पैसा-३’ परिवार आपलं स्वागत करीत आहेत!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कुशलच्या पोस्टवर सिद्धार्थ जाधवने, “खूप प्रेम भावा” अशी कमेंट केली आहे. तर, ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरने “किती छान लिहिलं आहेस दादा भारीच” अशी प्रतिक्रिया कुशलची पोस्ट वाचून दिली आहे. तेजस्विनी पंडित, हर्षदा खानविलकर, विशाखा सुभेदार या सगळ्यांनीच कुशलने लिहिलेल्या पोस्टचं भरभरून कौतुक केलं आहे.