Lalit Prabhakar on becoming atheist: अभिनेता ललित प्रभाकर हा नुकताच ‘आरपार’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
“काही गोष्टींबाबत मला प्रश्न…”
ललित प्रभाकरने ‘मिर्ची मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले की, कलाकार म्हणून मोठं व्हायला स्वातंत्र्य किती महत्त्वाचं वाटतं? यावर अभिनेता म्हणाला, “मी बंडखोर आहे. लहानपणापासूनच मी असा आहे. मी नास्तिक झालो ते कोणाच्यातरी प्रभावामुळे झालो नाही. मी शाळेत असतानाच काही गोष्टी वाचल्या. काही गोष्टींबाबत मला प्रश्न पडायला लागले. तिथूनच सुरुवात झाली की मला हे करायचं नाही, मी हे का करू? हे केल्याने काय होणार आहे? तर प्रश्न पडणं हे तिथून सुरू झालं.”
“कोणीतरी एखादी गोष्ट सांगतं म्हणून मी ती गोष्ट करत नाही. मला समजावून सांगितलं तर ते मी करेन. मला काम करतानासुद्धा असं होतं. तर एखादी गोष्ट करायची असेल, तर समोरच्याने ती का करायची आहे, समजावून सांगावी असं मला वाटतं.
अभिनेता पुढे असेही म्हणाला, “मला वाटतं की, स्वातंत्र्य खूप मोठ्या जबाबदारीतून येतं. मला स्वत:ला अजून ते स्वातंत्र्य पकडता आलेलं नाहीये, कारण ते सोयीचं असतं. आपण आपल्या पद्धतीने अमुक एखादी गोष्ट फ्रीडम आहे, असं सांगत असतो; तरीसुद्धा मी स्वत:ला खूप मोकळं ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या स्वत:च्या काही व्याख्या ठरवून मला स्वत:ला बंदिस्त करून घ्यायचं नाहीये. नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी, शिकण्यासाठी मला बंदिस्त राहायचं नाहीये. त्यामुळे मी अडकून राहिलो नाही.”
“मी जेव्हा संस्थेत काम करत होतो, तेव्हा मी असा पहिला मुलगा असेन, जो म्हणाला असेल की मला बाहेरच्या संस्थांमध्येदेखील काम करायचं आहे. कारण मला वाटतं की, आपण एकाच पद्धतीचं काम करतो. मला काही गोष्टींपुरतं मर्यादित राहायचं नाहीये, आणखी काय शक्यता आहे हे जाणून घ्यायचं आहे. या शक्यता तपासून पाहण्यासाठी मला जितकं मोकळं राहता येईल तितकं राहायचं.”
दरम्यान, ‘आरपार’ या चित्रपटात ललित प्रभाकरबरोबर अभिनेत्री ॠता दुर्गुळेदेखील प्रमुख भूमिकेत आहे. आता हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.