Abhinay Berde Shares Father Laxmikant Berde Memory : मराठी सिनेमांचा एक काळ गाजवलेल्या लक्ष्मीकांच बेर्डे यांना प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत. लक्ष्मीकांत बेर्डे जाऊन आता इतकी वर्षे झाली असली तरीही चाहत्यांचं, प्रेक्षकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम कमी झालेलं नाहीये आणि होणारही नाही. अभिनेते अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांनी मराठी सिनेमाचा एक काळ गाजवला. त्या काळात त्यांच्या अनेक सुपरहिट सिनेमांची रांग लागली होती.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केवळ मराठीच नव्हे, तर अनेक हिंदी सिनेमांतूनही आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यामुळे केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी प्रेक्षकांनाही लक्ष्मीकांत बेर्डे आपले वाटतात. हिंदी व मराठीमध्ये केलेल्या अनेक सिनेमांमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि ही लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. त्यांच्या लोकप्रियतेचे आजवर अनेक किस्से ऐकायला मिळाले आहेत. अशातच त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेनं एक आठवण शेअर केली आहे.

अभिनय बेर्डेनं नुकताच लोकशाही फ्रेंडलीशी संवाद साधला. यावेळी त्यानं बाबांसारखी लोकप्रियता कुणालाच मिळाली नसल्याचं म्हटलं. मला अनेक लोक म्हणत आले आहेत की, बाबांनी जे स्टारडम पाहिलं, ते त्यानंतर कोणीच पाहिलं नाही. त्यांच्यानंतर इंडस्ट्रीला खूप स्टार्स मिळाले; पण त्यांनी जे पाहिलंय, ते कोणीच पाहिलं नाही.”

पुढे अभिनयने एक अनुभव सांगितला, “तेव्हा बाबा नाटक आणि सिनेमा दोन्ही गोष्टी एकत्रच करायचे. आता बरेच जण म्हणतात की, मराठी कलाकार सगळीकडेच दिसतात. म्हणून प्रेक्षक त्यांना बघायला थिएटरमध्ये येत नाहीत. पण इतर भाषांमधील अभिनेतेसुद्धा टीव्हीवर वगैरेसुद्धा क्वचितच जातात. त्यांना बघायलासुद्धा प्रेक्षक थिएटरमध्ये जातात. माझे वडील तेव्हा टेलिव्हिजन, नाटक आणि सिनेमांतही काम करीत होते.”

पुढे अभिनय सांगतो, “दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात त्यांच्या नाटकांचे तीन प्रयोग आणि त्याच वेळी समोरच असलेल्या प्लाझा हॉलमध्ये सिनेमाचे तीन शो असायचे. एकाच दिवशी हे सहाही शो हाऊसफुल्ल असायचे. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे तुम्हाला शिवाजी मंदिर नाट्यगृहातही दिसतायत आणि लक्ष्मीकांत बेर्डे तुम्हाला प्लाझा हॉलमध्ये दिसायचे. हे कोणी अनुभवलं आहे का? जरी अनुभवलं असेल तरी ते खूप कमी लोक असतील. ही गोष्ट साध्य करणं म्हणजे प्रेक्षकांचं त्यांचं प्रेक्षकांवरील प्रेम आहे आणि ही खूपच कठीण गोष्ट आहे.”

अभिनय बेर्डे इन्स्टाग्राम पोस्ट

याच संवादात त्यानं पुढे सांगितलं, “माझे वडील लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे शेवटचे सुपरस्टार आहेत. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीनं नवनवीन गोष्टी आणि उत्तम दिग्दर्शन व लेखनावर लक्ष द्यावं. कारण- आता स्टारडमची परिभाषा सगळीकडेच बदलली आहे. कुठल्याच इंडस्ट्रीत आता स्टार्स बघायला मिळतील, याची खात्री देता येणार नाही; पण चांगल्या गोष्टी नक्की बघायला मिळतील.”