Madhura Welankar Shares Her Journey : संघर्ष हा कधीच कुणाला चुकलेला नाही. मनोरंजन क्षेत्रातला हा संघर्ष तर जरा अधिकच आहे. एखाद्या अनुभवी कलाकाराबरोबरच नवख्या कलाकारालासुद्धा या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासाठी कष्ट आणि संघर्ष करावे लागतात.
मनोरंजन सृष्टीत अनेक स्टारकिड्सनी आपलं नशीब आजमावलं आहे. पण क्वचितकच एखादा कलाकार यश मिळवू शकला आहे. स्टारकिड असल्याने या इंडस्ट्रीत त्याच्या वाटेला येणारा संघर्ष हा कमी असतो, असं अनेकांचं म्हणणं असतं. मात्र तसं अजिबातच नाही. स्टारकिड असूनही या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख मिळवण्यासाठी प्रत्येकाला आपला संघर्ष करावा लागतो.
बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीतही अनेक स्टारकिड्स आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री मधुरा वेलणकर. मधुरा ही ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची मुलगी आहे. प्रदीप वेलणकर यांची मुलगी असूनही अभिनेत्री आणि कलाकार म्हणून स्वत:ला सिद्ध करावं लागलं असल्याचं मधुरा म्हणाली आहे.
‘लोकशाही फ्रेंडली’ला दिलेल्या मुलाखतीत मधुरा म्हणाली, “कलाकारांची मुलं कामं करतात. पण त्यांचं काम चांगलं असेल, तरच ते या क्षेत्रात टिकून राहतात. स्टारकिड असलो तरी शेवटी स्वत:ला सिद्ध करावंच लागतं. मग तुम्ही कोणत्याही कलाकाराचा मुलगा किंवा मुलगी असाल… पण या क्षेत्रात अपयश आल्यानंतर एखाद्या इंडस्ट्रीबाहेरच्या व्यक्तीला त्याच्या घरून मिळणारा पाठिंबापेक्षा एखाद्या कलाकाराच्या मुलाला मिळणारा पाठिंबा जास्त योग्य असतो. इंडस्ट्रीबाहेरील व्यक्तीचे आई-वडील या क्षेत्रात नसल्याने त्यांना मुलाला पाठिंबा कसा द्यावा?, काय प्रोत्साहन द्यावं? किंवा त्याच्या अपयशात नेमकी कशी साथ द्यावी? हे कळत नाही. पण माझे आई-वडील या क्षेत्रात असल्याने ते हे करू शकतात.”
यानंतर मधुरा वेलणकर सांगते, “मला माझं आजपर्यंतचं एकही काम प्रदीप वेलणकर यांची मुलगी म्हणून मिळालेलं नाही. त्यामुळे माझं पहिलं काम सिद्ध केल्यानंतरच मला पुढचं काम मिळालं आहे. मी जर ते केलं नसते, तर मी टिकले नसते. कलाकार आई-वडिलांच्या नावे त्यांच्या मुलांना काम मिळालं तरी, अशी एक-दोन कामे मिळतील.”
मधुरा वेलणकर इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर मधुरा म्हणते, “कलाकारांच्या मुलांनाही अपयश येतं. आम्हालाही नकार मिळतात, इथे यश टिकवणं तसं फार कठीणच आहे. पण मला असं वाटतं की, तुमच्यात जर गुण असतील तर तुम्ही या क्षेत्रात वर्षानुवर्षे टिकू शकता. तुम्ही चांगलं काम करू शकता आणि तुम्ही काहीतरी बदल करू शकता. याची ताकद तुमची तुम्हाला स्वत:ला तयार करावी लागते.”
दरम्यान, मधुराने ‘बटरफ्लाय’, ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’, ‘हापूस’, ‘खबरदार’, ‘गोजिरी’, ‘उलाढाल’ आणि ‘आई नंबर १’ यांसारखे गाजलेले सिनेमे केले आहेत. याशिवाय ‘मृण्मयी’, ‘चक्रव्यूह’, ‘आपले घर’, ‘अनामिका’, ‘स्पंदन’, ‘तुमची मुलगी करते काय?’ सारख्या मालिकांमधूनही तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.