Mahesh Manjrekar : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा ५ ऑगस्टला वरळी येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार दिग्गज अभिनेते व लोकप्रिय मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार हा बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना प्रदान करण्यात आला आहे.

महेश मांजरेकर जीवनगौरव पुरस्कार स्वीकारत असताना त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अभिनेते म्हणाले, “राज्य पुरस्काराची ही जी बाहुली आहे, ती मला खरोखरच खूप जास्त प्रिय आहे. या पुरस्काराचा मला सार्थ अभिमान आहे. आज या बाहुलीचं महत्त्व फार मोठं आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टी ही योग्य हातात आहे आणि आपल्या मनोरंजनसृष्टीचा प्रवासही उंचावत जातोय याचा विशेष आनंद आहे. मी खात्रीने सांगतो, यावर्षी आम्ही सगळेच खूप मेहनत करू आणि पुन्हा एकदा आपला मराठी सिनेमा देदीप्यमान पदावर पोहोचलेला असेल.”

“सिनेमाची सुरुवात ही एका मराठी माणसाने म्हणजेच दादासाहेब फाळके यांनी केली होती आणि हा सिनेमा पुढे वाढवला व्ही. शांताराम यांनी…प्लाझा सिनेमागृहाकडे मी शांताराम बापूंना त्या थिएटरकडे बघताना पाहिलं होतं. आज त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. आज हा सन्मान होणं हे मी माझं भाग्य समजतो. रिटायर्ड होताना जीवनगौरव दिला जातो असा अनेकांचा समज असतो पण, मला माहितीये आणि आता अनुपम खेरजी सुद्धा असंच म्हणाले की, ही रिटायरमेंट नसून जबाबदारी आहे. अजून १० वर्षे तरी मी नवनवीन सिनेमे घेऊन तुमच्यापुढे येत राहीन. आजच्या नव्या दिग्दर्शकांना एक गोष्ट नक्की सांगेन, अलीकडे स्पर्धा खूप वाढतेय आणि आपण सगळ्यांनी त्या स्पर्धेत उतरणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सगळ्या रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार.” असं महेश मांजरेकरांनी सांगितलं.

मुक्ता बर्वेला चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार

याशिवाय लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वेला चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुक्ता म्हणाली, “मला केवळ कृतज्ञता हा एकच शब्द याक्षणी सुचतोय. हा पुरस्कार म्हणजे, माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. तुमच्या या अपेक्षा मी नक्कीच पूर्ण करेन. धन्यवाद!”