Mahesh Manjrekar Talk About Raj Thackeray Biopic : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मराठी इंडस्ट्रीमधील कलाकारांबरोबर चांगले ऋणानुबंध आहेत. मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार मंडळींनी ते राज ठाकरेंचे चाहते असल्याचं अनेकदा म्हटलं आहे. त्याचबरोबर अनेक कलाकारांचे राज ठाकरेंबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहेत. लोकप्रिय मराठी दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर हे तर राज ठाकरेंचे चांगले मित्र आहेत. राज ठाकरे आणि महेश मांजरेकरांच्या मैत्रीबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे.

मराठी अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर हे सध्या त्यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने महेश मांजरेकर ठिकठिकाणी मुलाखती देत आहेत. अशाच एका मुलाखतीदरम्यान महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित बायोपिक केला असल्याचं सांगितलं. तसेच या बायोपिकचं खास नावही त्यांनी ठेवलं होतं; मात्र पुढे हा बायोपिक का होऊ शकला नाही? याबद्दल महेश मांजरेकरांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

एबीपी माझावरील माझा कट्टामध्ये महेश मांजरेकर म्हणाले, “मला राज ठाकरेवर बायोपिक करायचा होता. मी तो लिहिलाही होता आणि त्याचं नाव ठेवलं होतं ‘बुद्धिबळ’. त्या बायोपिकची मी पूर्ण संहिता लिहिली; पण नंतर नाही करायचं, असं ठरवलं. कारण- मी खूप लोकांच्या पायावर पाय दिले असते. मला लिहिताना हे लक्षात आलं की, याचं पुढे काही घडणार नाही. खूपच रंजक गोष्ट होती ती… त्यातला मी एक सीन सांगेन, की एक वडील काकासमोर जिंकले, ही एकच लाइन मला खूप आवडली होती. कारण- काका आणि वडिलांच्या युद्धात नेहमीच वडील जिंकतात; पण ते मी त्यात टाकू शकत नाही.”

“राज ठाकरेचा मित्र असलो तरी…”

त्यानंतर ते सांगतात, “त्या सिनेमातला पहिला सीनच वादग्रस्त होता; पण तो सिनेमा करायचा राहिला तो राहिला. आताची वेळ एक उत्तम राजकीय सिनेमा करण्यासाठी योग्य आहे. कोण करेल मला माहीत नाही. मी तर नाही करणार. मी राज ठाकरेचा मित्र असलो तरी मी माझी राजकीय मतं कोणाला सांगत नाही. मला एखाद्या पक्षाची एखादी गोष्ट आवडते, तर दुसऱ्या पक्षानं केलेलं कामसुद्धा आवडतं.”

बायोपिक करू शकत नाही; कारण…

त्यानंतर महेश मांजरेकरांनी शरद पवारांच्या बायोपिकबद्दलही सांगितलं. ते म्हणाले, “मला शरद पवारांनीसुद्धा बायोपिक करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यावर मी खूप विचार केला; पण मला नंतर लक्षात आलं की, आपण बायोपिक करू शकत नाही. कारण- मग तो एखाद्या माणसाचं फक्त कौतुकच सांगा, असा सिनेमा होतो.”

दरम्यान, महेश मांजरेकरांचा आगामी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा येत्या ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यात त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप हे बालकलाकार मुख्य भूमिकांत आहेत. अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तसेच पृथ्वीक जगताप आणि सिद्धार्थ जाधव यांच्याही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे.