Makrand Anaspure & Shilpa Anaspure Lovestory : मकरंद अनासपुरे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये काम करत त्यांच्या विनोदीशैलीने प्रेक्षकांना पोट धरून हसवलं आहे, तर विविध चित्रपटांत त्यांनी अनेक लोकप्रिय अभिनेत्रींबरोबर काम केलं आहे आणि मोठ्या पडद्यावरील त्यांची नायिकांबरोबरची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही नेहमी आवडली आहे. अशातच आता त्यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील नायिकेबद्दल म्हणजेच त्यांच्या पत्नी शिल्पा अनासपुरे यांच्याबरोबरच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.

मकरंद अनासपुरे व त्यांच्या पत्नी शिल्पा अनासपुरे यांनी दूरदर्शन सह्याद्रीला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांची भेट कशी झाली, त्यांची प्रेमकहाणी कशी आहे याबद्दल सांगितलं आहे. मुलाखतीत शिल्पा यांना त्यांनी मकरंद यांची निवड का केली असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “मकरंदची आणि माझी मैत्री खूप चांगली होती. माझं ते पहिलंच नाटक होतं आणि त्याच्याकडे पाहताना त्याला खूप अनुभव आहे असं वाटायचं. तो मला मार्गदर्शन करायचा. मला वाचनाची फार आवड नव्हती, पण त्याने ती आवड मला लावली; त्याच्यामुळे मला अनेक लेखकांबद्दल कळलं.”

‘अशी’ आहे मकरंद अनासपुरे व शिल्पा अनासपुरे यांची प्रेमकहाणी

शिल्पा पुढे म्हणाल्या, “आमची मैत्री खुलत गेली आणि त्यावेळी घरून लग्नाचं सुरू होतं सगळं आणि आमची मैत्री चांगली होती म्हटलं आपल्याला संभाळून जो घेऊ शकेन त्याच्याशी लग्न करायचं बाकीच्या गोष्टी येत जात असतात. नशिबात ऐश्वर्य असेल तर ते कुठूनही येणारच आहे, पण स्वभाव जो असतो तो फार महत्त्वाचा असतो. असं मला वाटतं आणि मकरंद चांगला मित्र होता म्हणून मी त्याची निवड केली.”

मकरंद यांना आपली परिस्थिती फार बरी नसताना मुलगी आपल्या घरी येणार, मग तिला आनंदी कसं ठेवायचं याची काळजी वाटायची का असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “हो अर्थातच, कारण संसार थाटायचा म्हणजे एक जबाबदारीची गोष्ट आहे, ती सोपी गोष्ट नाही. सगळ्यात पहिलं श्रेय माझ्या सासू-सासऱ्यांना की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मुलीचा हात माझ्या हातात दिला आणि दुसरं श्रेय तिचं की तिला असा माणूस आवडला, ज्याचा काही आतापताच नाही. ती कॉन्वेंटमध्ये शिकलेली आणि मी मराठी माध्यमात. भाषेचाही खूप फरक होता.”

मकरंद पुढे म्हणाले, “मी चाळीत राहायचो. म्हणजे लग्न झालं आणि ती तिचा मोठा फ्लॅट सोडून माझ्याबरोबर चाळीत राहायला आली, त्यामुळे हे श्रेय तिचं आणि तिच्या आई-वडिलांचं आहे. आता माझी जी काही चांगली परिस्थिती आहे ती ही तिच्यामुळेच, तिचा पायगुण चांगला असावा.”