Mamata Sindhutai Sapkal Emotional Post : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ५३ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिका व चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारुन सर्वांचं मन जिंकून घेतलं. या सगळ्यात ज्योती चांदेकरांनी साकारलेली सिंधुताई सपकाळ यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करून गेली. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमादरम्यान, ज्योती चांदेकर व त्यांची मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी एकत्र काम केलं होतं.
दरम्यान, सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत ज्योती चांदेकरांना अखेरचा निरोप दिला आहे.
ममता सपकाळ यांची पोस्ट
प्रिय ज्योती ताई,
असं अचानक तुमचं पुढच्या प्रवासाला निघून जाणं माझ्यासाठी न पचवता येण्यासारखं आहे.
काल तुमचं शेवटचं दर्शन घेताना मला मात्र तुम्ही २००९ साली माईंना भेटायला आला होतात तेच आठवत होतं.
सोबत नाजूक चणीची अतिशय गोड अशी तेजु शांतपणे तुमचा आणि माईंचा होणारा संवाद ऐकत होती आणि समजून घेत होती.
तुम्ही मात्र माईंची प्रत्येक ढब, प्रत्येक हालचाल टिपून घेत होतात.
“मी सिंधुताई सपकाळ” मध्ये जशीच्या तशी माई वठवताना तुमची निरीक्षण शक्ती किती अफाट आहे हे कळून येत होतं.
मध्यंतरीच्या काळात “गझलरंग”च्या निमित्ताने आपल्या भेटी होत राहिल्या कधीतरी फोनवर बोलणं होत राहिलं पण कायमच तुम्ही मला माझ्या जवळच्या वाटलात.
काल तेजुला बघताना मला तुम्ही दिसत होतात ताई.
मी या आधी जेव्हा कधी तेजुला भेटले तेव्हाची तेजु आणि कालची तेजु फार फरक जाणवला ताई.
माझ्यासारखी ती सुद्धा अचानक मोठी झाल्यासारखी वाटली आणि तिच्या जागेवर मला मीच दिसू लागले.
तिचे वाहणारे डोळे तिने फोडलेला हंबरडा मी नाही समजू शकणार तर कोण समजू शकेल.
ताई, मनुष्य जन्म नश्वर आहे हे माहीत आहे मला पण, तुम्ही जाण्याची इतकी घाई का केलीत ते मात्र प्रश्नचिन्हच आहे माझ्यासाठी.
जिथे असाल तिथे आनंदात असा ताई. माईंची भेट झाली तर सांगा ममता ठीक आहे.
तुमचा वसा आणि वारसा जबाबदारीने सांभाळते आहे.
तुमची,
ममता.
दरम्यान, ज्योती चांदेकर गेल्या अडीच वर्षांपासून स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. त्यांच्या निधनानंतर मालिकेतील सहकलाकार आणि चाहत्यांना देखील खूप मोठा धक्का बसला आहे. ज्योची चांदेकरांना वयाच्या ६९ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पौर्णिमा आणि तेजस्विनी या दोन मुली आहेत.