Radhika Bhide Playback Singing Debut : ‘मन धावतंया तुझ्याच मागं…’ हे गाणं सध्या प्रत्येकाच्याच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. फेसबुक असो, इन्स्टाग्राम असो किंवा कुणाचे व्हॉट्सअप स्टेट्स असोत… सगळीकडे फक्त हेच गाणं ऐकायला मिळत आहे. हे गाणं गायलं आहे, मराठमोळ्या राधिका भिडेने. अशातच I-PopStar या रिअॅलिटी शोमधून सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या राधिकाला मराठी सिनेमासाठी गाणं गाण्याची मोठी संधी मिळाली आहे.
नऊवारी साडी, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावून एका रिअॅलिटी शोमध्ये गाणारी राधिका भिडेची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. राधिका भिडे कोकणकन्याने आपल्या गोड आवाजात हिंदी शोमध्ये मराठी गाणं गाऊन सगळ्यांना मराठीच्या प्रेमात पाडलं आहे. मधाळ हास्याबरोबरच राधिकाचा सुमधुर आवाज अनेक संगीतप्रेमींच्या मनात घर करून गेला आहे.
आता राधिका तिच्या आगामी नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याद्वारे ती पार्श्वगायनात पदार्पण करीत आहे. रेणुका शहाणे यांच्या ‘उत्तर’ या आगामी सिनेमातल्या ‘हो आई…’ या गाण्यासाठी राधिकाने पार्श्वगायन केलं आहे. नुकतीच या गाण्याची झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. आपल्या पहिल्या सिनेमातल्या गाण्यासाठीचा अनुभवही राधिकानं शेअर केला आहे.
राधिका म्हणाली, “मराठी चित्रपटासाठी माझं पाहिलं गाणं येत आहे. ‘उत्तर’ या सिनेमासाठी मी पहिलं पार्श्वगायन करीत आहे आणि यानिमित्ताने मी पार्श्वगायनात पदार्पण करीत आहे. दरवेळी आपली आई आपल्याला गिफ्ट देत असते. यावेळी आपण आपल्या आईला काहीतरी गिफ्ट देऊ. जसं हे गाणं मी माझ्या आईला गिफ्ट म्हणून देणार आहे.”
राधिका भिडे नवीन गाणं ‘हो आई…’
राधिका भिडेच्या आवाजतलं ‘हो आई…’ या गाण्याचं संगीत लोकप्रिय मराठी संगीतकार अमितराज आहे. तर या गाण्याचे शब्द गीतकार-लेखक क्षितीज पटवर्धनने केलं आहे. ‘उत्तर’ या सिनेमाचं दिग्दर्शनही क्षितीज पटवर्धननंच केलं आहे. या सिनेमातून तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. ‘उत्तर’ सिनेमात रेणुका शहाणे आईच्या भूमिकेत आहे; तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत आहे. तसंच अभिनेत्री ऋता दुर्गुळेचीसुद्धा या सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे.
दरम्यान, राधिका भिडेबद्दल सांगायचं झाल्यास, ती एक लोकप्रिय संगीतकार, गायिका आणि गीतकार आहे. तिने हिंदी सीरिज ‘ताजा खबर २’, ‘दे धक्का २’, ‘हर हर महादेव’ या मराठी सिनेमांसाठी बॅकग्राऊंड स्कोरिंग आणि व्होकल प्रोडक्शनचं काम पाहिलं आहे. याशिवाय तिनं काही गुजराती गाण्यांसाठी पार्श्वसंगीत देण्याचं काम केलं आहे. राधिक सोशल मीडियावर गाण्याचे अनेक व्हिडीओ शेअर करीत असते. अशातच आता ती सिनेमासाठीचं पहिलं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
