Ajinkya Deo on Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांचा, त्यांच्या अभिनयाचा आणि त्यांच्या चित्रपटातील भूमिकांचा प्रभाव अनेकांवर आहे. फक्त प्रेक्षकच नाही तर अनेक कलाकारांवरदेखील अमिताभ बच्चन यांचा प्रभाव आहे.
आता लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव यांनी एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. बिग बींचा त्यांच्यावर किती प्रभाव आहे, यावर त्यांनी वक्तव्य केले आहे.
“मला नशिबाने त्यांच्यासारखी…”
अजिंक्य देव यांनी अमोल परचुरेंना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले, तुझ्यावर अमिताभ बच्चन यांचा किती प्रभाव आहे? यावर अजिंक्य देव म्हणाले, “माझ्यावर त्यांचा खूप प्रभाव आहे. मी खूप लहान होतो, आनंद चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी त्यांना पहिल्यांदा भेटलो. चेंबूरला मोहन स्टुडिओला शूटिंग सुरू होते.”
“त्यानंतर बी. आर. चोप्रा यांचा जमीर नावाचा चित्रपट होता, त्यावेळीही मी लहान होतो. जत्रेच्या सीनचे शूटिंग सुरू होते. मी बाबांबरोबर तिथे गेलेलो. तेव्हा बाबांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. त्यावेळी एअरगन होती, ती मला चालवायला लावली, ही तेव्हाची आठवण आहे, काही फोटोदेखील काढले.”
अजिंक्य देव पुढे म्हणाले, “खुद्दार चित्रपटाचे शूटिंग सुरू होते तेव्हा आम्ही काश्मीरला होतो. त्यादरम्यान बच्चन साहेबांची मोठी लोकप्रियता होती. त्यांचा खूप प्रभाव पडला, कारण ते ज्या काळात आले, तेव्हा देशाला एका अँग्री यंग मॅनची गरज होती. त्यांनी ती पोकळी भरून काढली. मला नशिबाने त्यांच्यासारखी उंची मिळाली. मी माझ्या आवाजावर काम केले, जो त्यांच्या आवाजाच्या जवळ जाणारा आहे. तर मला असे वाटते की चांगला प्रभाव कधीही वाया जात नाही, त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल आम्ही ऐकलं आहे.”
“बाबा आणि आई त्यांना भेटायला…”
अमिताभ बच्चन यांचा एक किस्सा सांगत अजिंक्य देव म्हणाले, “वासुदेव बळवंत फडके चित्रपटाचं हिंदीमध्ये डबिंग करायचं होतं. शेमारुने तो चित्रपट घेतला होता. हिंदीसाठी त्यांनी बच्चन साहेबांचा आवाज पाहिजे असे सांगितले. बाबा प्रयत्न करतो म्हणाले. बाबा आणि आई त्यांना भेटायला गेले. बच्चन साहेबांनी होकार दिला. त्यानंतर महिना-दीड महिना गेला, त्यानंतर त्यांच्या पीएचा फोन आला. त्यांनी सांगितले की सकाळी साडे पाच वाजता सर येतील. नेमकं त्याचवेळी चित्रपटाचा दिग्दर्शक गजेंद्र मुंबईत नव्हता, तो दुसरीकडे शूटिंग करत होता.”
“दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही साडे पाच वाजता फिरोद नाडियादवाला यांच्या स्टुडिओला डबिंग करण्यासाठी आलो. बरोबर साडे पाच वाजता साहेब स्वत: गाडी चालवत आले. डबिंग सुरू झालं. आम्ही बूथ बाहेर बसलो होतो. प्रत्येक टेकनंतर ते आम्हाला विचारायचे की ठीक वाटतंय का? बाबा म्हणायचे हो सर, बरोबर झालं आहे. तर ते म्हणायचे की नाही, तुमच्या मुलाला विचारा. त्यावर मी म्हटलं की, सर, मी कोण आहे तुम्हाला सांगणारा? मी कोणीच नाही.”
“अमिताभ बच्चन यांनी आधी सांगितलेलं की तासाभरात जाईन, पण डबिंग झाल्यानंतर त्यांनी विचारलं की मला हा चित्रपट पाहायचा आहे. किती तासांचा चित्रपट आहे? आम्ही त्यांना वेळ सांगितला. त्यांनी तो चित्रपट पाहिला. ते म्हणाले की, रमेशजी मला माहीत नव्हतं की इतक्या चांगल्या दर्जाचे मराठी चित्रपट बनतात. मला खूप आनंद झाला, असे म्हणत त्यांनी चित्रपटाचे कौतुक केले. या त्यांच्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अमिताभ बच्चन खूप नम्र आहेत.”
“हे जितकं दैवी असेल तितकं…”
अजिंक्य देव असेही म्हणाले, “माणूस ज्या उंचीवर पोहोचतो त्यामध्ये देवाचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे. आई-वडिलांचे तुमच्यामागे जे वलय आणि आशीर्वाद असतो, तो महत्त्वाचा असतो. त्यानंतर तुमचं कर्तृत्व महत्त्वाचे आहे. उगाचच ती उंची गाठू शकत नाही. कामाप्रतीचे समर्पणही महत्त्वाचे असते. साहेब ८४ वर्षांचे आहेत. त्यांची कौन बनेगा करोडपतीमधील ऊर्जा कमाल आहे. हे जितकं दैवी असेल तितकं मानवीदेखील आहे. “
आणखी एका किस्सा सांगत अजिंक्य देव म्हणाले, “इंद्रजीत या चित्रपटात मी नकारात्मक भूमिका साकारली होती. अमिताभ बच्चन माझा खून करतात असा सीन चित्रपटात आहे. ते ज्यावेळी मला चाकू मारतात, त्यावेळी कॅमेरा त्यांच्या पाठीमागे होता, त्यामुळे मी दिसत नव्हतो. माझे एक्स्प्रेशन दिसावेत म्हणून त्यांनी त्या सीनचे पुन्हा शूटिंग केले. हे त्यांचे कामाप्रतीचे समर्पण आहे, त्यामुळे कोणीही अमिताभ बच्चन होऊ शकत नाही”, असे म्हणत अजिंक्य देव यांनी अमिताभ बच्चन यांचे कौतुक केले.
