खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे कायमच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘शिवप्रताप-गरुडझेप’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. हा चित्रपपट छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लाल किल्ल्यातून झालेली सुटका यावर आधारित होता. या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक केले गेले. मात्र नुकतंच अमोल कोल्हे यांनी एका प्रसंगाबद्दल सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या अमोल ते अन्मोल या युट्यूब चॅनलला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही कटू प्रसंगाबद्दल भाष्य केले आहे. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेसाठी तुमचा आवाज सूट होणार नाही, असं मला एकदा सांगण्यात आले, या अनुभवाबद्दल सांगितले.
आणखी वाचा : “एका विशिष्ट भाषेतील चित्रपटसृष्टी…” ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर अमोल कोल्हेंचे ‘ते’ ट्वीट चर्चेत

अमोल कोल्हे काय म्हणाले?

“मी २००७ मध्ये राजा शिवछत्रपती या मालिकेपासून खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्याचे भाग्य मला लाभलं. त्यानंतर मी नाटक, महानाट्य, चित्रपट किंवा मालिका या माध्यमातून ही भूमिका साकारण्याचे भाग्य मला कायमच लाभत राहिलं. काही दिवसांपूर्वी मला अचानक एक फोन आला आणि दुर्गदुर्गेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली राजधानी किल्ले रायगड जो प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान आहे आणि त्याचा अभिमानही आहे. त्या किल्ले रायगडावर एक लाईट अँड साऊंड शो होणार आहे. त्या शो साठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेसाठी आवाज म्हणून माझा आवाज वापरण्याची त्यांची इच्छा आहे. हे शक्य होईल का?

मी कोणतंही काम हे छत्रपती शिवरायांचं काम असतं असंच समजून करतो. त्यामुळे वेळेचे बंधन किंवा मानधनाची अट असं काहीही नसतं. मी त्यांना लगेचच कोणती तारीख हवी असे विचारले. त्याबरोबर मानधनाच्या बाबतीत पाकिटात जे काही द्याल ते मला मान्य आहे. मी यासाठी फारच उत्सुक होतो आणि याची वाट पाहत होतो. एखाद्या लाईट अँड साऊंड शो साठी जर माझा आवाज लागणार असेल तर कोणत्याही शिवभक्तासाठी ही भाग्याची गोष्ट आहे.

पण दोन दिवसांनी जेव्हा मला एक फोन आला तेव्हा त्यांनी मला सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेसाठी तुमचा आवाज नीट वाटणार नाही. खरंतर नाकारलं जाणं यात काहीही गैर नाही. पण १६ वर्ष एखादी व्यक्तिरेखा करत असताना अचानक तुम्हाला कळतं की तुमचा आवाज सूट होणार नाही, तेव्हा नक्कीच निराशेपेक्षा एक आश्चर्याचा धक्का असतो. पण त्यापेक्षा अनेक प्रश्न निर्माण होतात. मग हा कदाचित कुठेतरी हा सरकारी साक्षात्कार आहे का? अशी शंका सतत वाटत राहते”, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा : खासदारांना माज असतो म्हणणाऱ्याला डॉ. अमोल कोल्हेंनी दिलं भन्नाट उत्तर; म्हणाले, “तुमचं मत…”

दरम्यान अमोल कोल्हे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेमधून ते घराघरात प्रसिद्ध झाले. तसेच ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor dr amol kolhe share incident said some person told your voice will not suit for chhatrapati shivaji maharaj character nrp
First published on: 30-03-2023 at 09:05 IST